अधिकाऱ्याच्या बोगस स्वाक्षऱ्या करुन दीड कोटी लाटले, भाजप नगरसेवकावर आरोप
महानगपालिकेच्या सत्ताधारी भाजप पक्षाच्या नगरसेवकाने अधिकाऱ्यांच्या बोगस स्वाक्षऱ्या करून दीड कोटीपेक्षा जास्त रुपयांची बिलं उचलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आला.
सोलापूर : महानगपालिकेच्या सत्ताधारी भाजप पक्षाच्या नगरसेवकाने अधिकाऱ्यांच्या बोगस स्वाक्षऱ्या करून दीड कोटीपेक्षा जास्त रुपयांची बिलं उचलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आला (Solapur BJP corporator). या प्रकरणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेऊन पुरावे सादर केले. प्रकरण उघडकीस आल्याने पालिका आयुक्तांनी तीन अधिकाऱ्यांची समिती नेमून या नगरसेवकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांनी करस्वरूपात भरलेल्या पैशांवर अशा प्रकारे नगरसेवकच डल्ला मारत असतील, तर करायचं काय असा सवाल आता उपस्थित केला जात आहे (BJP Corporator Corruption).
सोलापूर महानगरपालिका आणि घोटाळा असं जणू कांही समीकरण बनलं आहे. टँकर घोटाळा, आरोग्य विभागात डिझेल घोटाळा, अॅडव्हान्स रकमेचा घोटाळा, एलबीटी घोटाळा, टॉवर घोटाळा, वृक्षारोपण घोटाळा, जीआय सर्वे घोटाळा, परिवहन घोटाळा, सार्वजनिक शौचालय दुरुस्ती घोटाळा अशा अनेक घोटाळ्याबाबत अद्याप काहीही कारवाई झालेली नाही. अशा परिस्थितीत आता त्यात एका नव्या घोटाळ्याची भर पडली आहे.
काम न करताच अधिकाऱ्यांच्या बोगस स्वाक्षऱ्या करून बिले उचलली
शहरात विविध योजनेतून नगरसेवकांच्या शिफारसीनुसार विकास कामे केली जातात. प्रभाग क्रमांक 1 मध्ये एकच काम विविध योजनेत केल्याचे दाखवून तसेच, अधिकाऱ्यांच्या बोगस स्वाक्षऱ्या करून करोडो रुपयांची बिलं उचलल्याचा आरोप विरोधी पक्षातील नगरसेवकांनी भाजप नेगरसेवकावर केला. याचे पुरावे नगरसेवकांनी आयुक्तांसमोर सादर केले. पालिकेच्या अधिकाऱ्यावर खोटे गुन्हे दाखल करून अडकवायची धमकी देऊन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही या भाजप नगरसेवकावर करण्यात आला आहे. मात्र नगरसेवकाचं नाव अद्याप उघड करण्यात आलेलं नाही. प्रभाग 1 मध्ये गेल्या तीन वर्षांपासून अधिकाऱ्याच्या बोगस स्वाक्षऱ्या करून बिले काढल्याचे अधिकारीही सांगत आहेत.
तक्रार करणारी मंडळी बोगस बिले काढण्यास सांगणाऱ्या भाजपच्या नगरसेवकाचे नाव घ्यायला तयार नाहीत. मात्र, संशयाची सुई ही नगरसेवक विनायक विटकर यांच्याकडे असल्याची चर्चा आहे. तर माजी पालकमंत्री आणि शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी भाजपचे नगरसेवक बोगस स्वाक्षऱ्या करणार नाहीत आणि बिले उचलणार नाहीत, असे ठामपणे सांगितलं. याउलट, विरोधक असा आरोप करत असतात चौकशी झाल्यानंतर सत्य समोर येईल असं देशमुख म्हणाले.
तर दुसरीकडे, मनपा आयुक्तांनी मात्र बोगस बिलाचे गैरकृत्य झाल्याचे कबुल करत तीन वर्षातील सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती आणि बोगस स्वाक्षऱ्या केल्याचा गुन्हा गंभीर असल्याचे सांगत गुन्हा दाखल करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. आता या प्रकरणी लवकरच मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल होणार आहे. पोलीस तपासात जनतेचा पैसा लूटणारा नगरसेवक आणि भ्रष्ट अधिकारी कोण याचा उलगडा लवकरच होण्याची शक्यता आहे.