शरद पवार हे मोठे नेते, त्यांनी असं गुपचूप भेटणं सोडावं; काँग्रेसच्या नेत्याचा शरद पवार यांना थेट सवाल
Sharad Pawar Ajit Pawar Meeting in Pune : काँग्रेस नाही तर भाजपमध्येच फूट पडेल; काँग्रेसच्या 'या' नेत्याला विश्वास व्यक्त केला आहे. अजित पवार यांच्यासोबतच्या गुप्तभेटीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना काँग्रेसच्या नेत्याचा थेट सवाल केला आहे. वाचा...
सोलापूर | 15 ऑगस्ट 2023 : अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात फूट पडली. शरद पवार यांच्यासोबत असणारा तर अजित पवार यांना मानणारा असे दोन गट राष्ट्रवादीत निर्माण झाले. त्या सगळ्यानंतर शरद पवार यांचीच ही राजकीय खेळी असल्याचं बोललं गेलं. पण त्यानंतर शरद पवार यांनी आपण भाजपसोबत जाणार नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं. पण पुण्यात झालेल्या एका भेटीमुळे पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली ती अजित पवार आणि शरद पवार यांच्या भूमिकेची… या सगळ्यावर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेने आक्षेप नोंदवला. आता काँग्रेसचे माजी खासदार, काँग्रेसचे वरिष्ठ नेते हुसेन दलवाई यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेस नेते हुसेन दलवाई हे सध्या माढा लोकसभा मतदारसंघात आहेत. तिथे ते आढावा घेत आहेत. तेव्हा टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. शरद पवार आणि अजित पवार यांच्या गुप्तभेटीवरही भाष्य केलं आहे. शरद पवार हे मोठे नेते आहेत. मात्र त्यांनी असे गुपचूप भेटणं सोडून द्यावं.यामुळे शंका निर्माण होत आहेत. जनतेच्या मनात संभ्रम होऊ लागला आहे.जे गेलेत त्यांना जाऊद्या ना. तुम्ही का भेटताय? असा सवाल हुसेन दलवाई यांनी विचारला आहे.
आधी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व नाकारत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यानंतर अजित पवार यांनीही आपल्या समर्थक आमदारांसह युती सरकारला पाठिंबा दिला. ते शिंदे सरकारमध्ये सामील झाले. त्यांच्यापाठोपाठ आता काँग्रेसमध्येही फूट पडणार असल्याचं बोललं जात आहे. त्यावरही हुसेन दलवाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेस पक्ष कधीही फुटणार नाही. भाजपची मंडळीच काँग्रेस फुटणार, अशी नेहमी चर्चा करत असतात.मात्र अनेक मतदार संघात भाजपच्या जुन्या आमदार-खासदारांना तिकीट मिळेल का नाही सांगता येत नाही. असे भाजपाचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट हुसेन दलवाई यांनी केला आहे.
भाजपचे नेते जरी काँग्रेस मध्ये येण्यास उत्सुक असले तरी मात्र त्यांना पक्षात घेतले जाईल की नाही, हे सांगता येत नाही. कारण भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घेऊ नका, अश्या राहुल गांधी यांच्या सूचना आहेत. तेच ठरवतील भाजपाच्या नेत्यांना पक्षात प्रवेश द्यायचा की नाही ते, असंही दलवाई म्हणाले.