सोलापूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना टोला लगावला आहे. इथे कोणी भुट्टा येईल आणि काहीही बोलून जाईल हे खपवून घेणार नाही, असं नाना पटोले म्हणालेत. तसंच लोकसभेच्या दोन जागांवरही काँग्रेसने दावा केलाय. इथे कोणी भुट्टा येईल आणि काहीही बोलून जाईल हे खपवून घेणार नाही,असं म्हणत पटोले यांनी रोहित पवार यांना इशाराच दिला आहे.
सोलापूरसह माढा लोकसभेवर नाना पटोले यांचा दावा केला आहे. मला सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदार निवडून आणायचे आहेत, असं ते म्हणालेत.
सोलापूर भाजपचे माजी शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांनी आज काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे. नाना पटोले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश केलाय. अशोक निंबर्गी हे प्रमोद महाजन यांच्यापासून भाजपत कार्यरत होते. मात्र आज त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचं नाना पटोले यांनी स्वागत केलंय. तर भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र डागलंय.
एका काळ्या टोपीवाल्याला राज्यपाल पदावर बसवले. त्यांनी आंबेडकर, शिवराय, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला. अशा भाजपला सोडून आपण भाजपला सोडून आलात त्याबद्दल अशोक निंबर्गी यांचं स्वागत असं ते म्हणालेत.
मी मोदीसारखा खोटारडा माणूस नाही. मोदींनी सांगितले होते की, सैनिकांचे ड्रेस सोलापुरात शिवतो. मात्र आता सरकारने सैनिकच ठेवले नाहीत त्यांचे खासगीकरण केलं. महाराष्ट्रातील कोळी समाज काँग्रेसच्या पाठीशी उभे करा, मी राज्यातील सर्व तलाव पूर्णतः मोफत करून देतो.सोलापुरात हुतात्मे, महात्मे आणि क्रांतिवीर आहेत. सोलापूरचे पूर्वीचे खासदार हे मोठ्या अंगठ्या घालून यायचे आणि लोकसभेत झोपत होते, असं म्हणत पटोले यांनी भाजपचे माजी खासदार शरद बनसोडे यांच्यावर टीका केलीये.
नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली आहे. खोटारडी व्यवस्था, लोकशाही मान्य नसलेला आणि लोकांना गरीब ठेवणारा पक्ष म्हणजे भाजप आहे, असं ते म्हणाले.
सोलापूरकर हे मागील दहा वर्षात ते पन्नास वर्ष मागे गेले आहेत. भाजपच्या विचारला माफ करण्याची वेळ नाही. नाहीतर तुम्ही संपाल. महाराष्ट्रात मागील काही दिवसात 9 धार्मिक दंगली झाल्या. अकोल्यात 2 हजार पोलिस आहेत मात्र दंगल सुरु झाल्यावर तिथले पोलीस गायब होते. दोन तास तिथे पोलीस नव्हते. म्हणून मी पोलीस महासंचालकांना विचारलं की पोलिसांवर कोणाचा दबाव आहे?, असं पटोले म्हणालेत.