सोलापूर : रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरून कौतुक केलंय. तर राष्ट्रवादीवर टीका केलीय. देवेंद्र फडणवीस हे प्रस्थापितांची बाजू घेत नाहीत. त्या माणसाकडे साखर कारखाना, दूध संघ, बॅंका असं काही नाही. आमची एकच अपेक्षा आहे.. गड्या तुझं काही नाही, फक्त आता या प्रस्थापितांना सुरुंग लाव. यांना सुरंग लावला की, फडणवीस हा माणूस 80 वर्ष राज्य करेल… मात्र हे गडी उध्वस्त केले पाहिजेत, असं म्हणत नाव न घेता त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.
पण हे गडी एवढे हुशार की, पहाटेचे जाऊन भेटतात. तेव्हा ते एवढे गोड बोलतात की ते आपले सासरे बुवा झाले की काय असे वाटते. मी फडणवीसांना सांगीन की, हे कडू सासरे आहेत. यांच्यापासून सावध राहा… नाहीतर गुगल्या पडल्याच म्हणून समजा, असं म्हणत खोत यांनी फडणवीसांना सल्ला दिलाय. तर शरद पवारांवर टीका केली आहे.
औरंगजेबाच्या सैन्याला पाणवठ्यावर जसं संताजी, धनाजी दिसत होते. तसंच शरद पवारांना अपघात झालेल्या मृत आत्म्यांमध्ये आता देवेंद्र फडणवीस दिसत आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या राजकीय जीवनातील ही मोठी शोकांतिका आहे, असं म्हणत खोत यांनी घणाघात केलाय.
शरद पवार हे क्रिकेटचे अध्यक्ष बेकायदेशीर होते. क्रिकेटचा अध्यक्ष कुणी असावं… बॅटिंग करायला येते, बॉलिंग करायला येते, फील्डिंग करायला, येते शरद पवार यांना काहीच येत नाही. शरद पवार कुस्ती संघाचे अध्यक्ष होते… त्यांनी कधी कुस्त्या गाजवलेले आहेत. हिंदकेसरी कधी मिळवला आहे हे कधी माझ्या ऐकत नाही. जिथे पैसा तिथे पवार घराणे आहे… त्यामुळं पैसा यायला लागला की ते कशाचेही अध्यक्ष होतात, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र डागलंय.
सध्याच्या महाभारतातला शकुनी मामा कोण असेल तर ते शरद पवार आहेत. शकुनी मामा सारखाच सोंगाड्याचा डाव खेळा होता आणि भाजप शिवसेनेचं सरकार घालवलं, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार मागच्या वर्षभरापासून रखडलेला आहे. त्यावर बोलताना, मंत्रिमंडळ विस्तार हा अधिकार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा आहे. आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करतो. आमच्या मागे एकही आमदार आहेत, ना खासदार आहेत. तिथे मुंडक्याला महत्त्व आहे. ते आमच्या पाठीमागे नाही. त्यामुळे आम्ही कशाला म्हणावं आम्हाला घेता का. त्यांनी कुणालाबी घ्यावं फक्त शेतकऱ्यांची कामं करावीत, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं.