… तर आम्हाला सांगलीची जागा नको : राजू शेट्टी
सांगली : काँग्रेसमधून सांगलीत बंडखोरी होण्याच्या भीतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी धास्तावले आहेत. बंडखोरी होणार असेल, तर आम्हाला सांगलीची जागा नको, अशी भूमिका त्यांनी सांगलीत पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली. सांगलीची जागा द्यायची असेल, तर वाद मिटवून द्या, याबाबत आम्ही पक्षश्रेष्ठींना कळवलं आहे. वाद होणार असेल, तर ही जागा नको. आम्हाला राहिलेली एक […]
सांगली : काँग्रेसमधून सांगलीत बंडखोरी होण्याच्या भीतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी धास्तावले आहेत. बंडखोरी होणार असेल, तर आम्हाला सांगलीची जागा नको, अशी भूमिका त्यांनी सांगलीत पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली. सांगलीची जागा द्यायची असेल, तर वाद मिटवून द्या, याबाबत आम्ही पक्षश्रेष्ठींना कळवलं आहे. वाद होणार असेल, तर ही जागा नको. आम्हाला राहिलेली एक जागा देण्याबाबत काँग्रेसने उद्यापर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा मी एकटा निवडणूक लढणार आहे, असंही त्यांनी म्हटलंय.
सांगली लोकसभेची जागा ही काँग्रेसकडे राहणार की स्वाभिमानीला मिळणार याचा तिढा सुटलेला नाही. मात्र सांगलीच्या जागेवरुन सुरु असलेला वाद पाहता राजू शेट्टी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आमचा फक्त सांगलीसाठी आग्रह नव्हता, तरीही विनाकारण स्वाभिमानीकडून, वसंतदादा कुटुंबावर अन्याय केला जात असल्याचं चुकीचं वातावरण निर्माण केलं जातंय. आम्हाला चुकीच्या पद्धतीने, आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे हे चुकीचे आहे, अस राजू शेट्टी म्हणाले.
सांगलीची जागा स्वाभिमानीला देण्यावरुन वाद होणार असेल आणि बंडखोरी होणार असेल तर आम्हाला सांगलीची जागा नको. जागा द्यायची असेल तर वाद मिटवून द्या, असं आम्ही काँग्रेसला कळवलं आहे, अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली.
आम्हाला राहिलेली एक जागा देण्याबाबत काँग्रेसने उद्यापर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा मी एकाकी लढवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. उद्यापर्यंतच्या अल्टीमेटमवर काँग्रेस कोणता निर्णय घेणार याकडे आता पुढील निर्णय अवलंबून असेल.
दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा यांचे नातू प्रतिक पाटील आणि विशाल पाटील यांनाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढण्यास आम्ही ऑफर दिली होती. मात्र त्यांनी नकार दिला, अशी माहितीही खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
काय आहे नेमका वाद?
वसंतदादा पाटलांचे नातू प्रतिक पाटील यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त करत पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. काँग्रेसने जाणिवपूर्वक सांगलीची जागा स्वाभिमानीला सोडल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीमध्ये सांगलीची जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे. स्वाभिमानीला राष्ट्रवादीने एक आणि काँग्रेसने एक अशा दोन जागा दिल्या आहेत. हातकणंगले ही राष्ट्रवादीची जागा राजू शेट्टी यांच्यासाठी, तर सांगलीची जागा काँग्रेसकडून स्वाभिमानीला सोडली जाणार असल्याची माहिती आहे. पण त्यापूर्वीच काँग्रेसमध्ये फूट पडली आहे.