‘शरद पवारांसारखी माणसं आज काँग्रेसमध्ये नसतील तर त्यास जबाबदार कोण?’
राहुल गांधी हेच आज काँग्रेसचे सेनापती आहेत. त्यांचे सरकारवरील हल्ले अचूक आहेत. | Sanjay Raut Sonia Gandhi
मुंबई: महाराष्ट्रातील काँग्रेसचे पुढारी आपण सामना वाचत नसल्याचा टेंभा मिरवतात. हा त्यांचा प्रश्न आहे. पण सोनिया गांधीही ‘सामना’ची दखल घेतात, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाना पटोले यांना प्रत्युत्तर दिले आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर ‘सामना’त अग्रलेख छापून आला होता. त्यामध्ये काँग्रेसच्या (Congress) नेतृत्त्वाविषयी शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांना फटकारले होते. आम्ही संजय राऊत यांच्या बोलण्याकडे लक्षही देत नाही आणि ‘सामना’ही वाचत नाही, असे त्यांनी म्हटले होते. (Shivsena MP Sanjay Raut hits back congress leader Nana Patole)
या पार्श्वभूमीवर ‘सामना’च्या अग्रलेखातून नाना पटोले यांना पुन्हा एकदा चिमटा काढण्यात आला. सोनिया गांधी यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीवर चिंता व्यक्त केली. निकाल इतके निराशाजनक आहेत की पक्षात काही दुरुस्त्या कराव्या लागतील. महाराष्ट्रातील काँग्रेसचे पुढारी आपण सामना वाचत नसल्याचा टेंभा मिरवतात हा त्यांचा प्रश्न, पण सोनिया गांधी ‘सामना’ची दखल घेतात, हे काल पुन्हा एकदा दिसून आले. काँग्रेसला आसाम, केरळमध्ये चांगली लढत देऊनही सत्तेवर का येता आले नाही, हा ‘सामना’ने उपस्थित केलेलाच प्रश्न सोनिया गांधी यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातील जुन्याजाणत्या काँग्रेस पुढाऱ्यांनीही सामना वाचून सोनियांपर्यंत लोकभावना पोहोचवल्या असतील तर चांगलेच आहे, असे अग्रलेखात म्हटले आहे.
‘पवारांसारखी माणसं आज काँग्रेसमध्ये नसतील तर त्यास जबाबदार कोण?’
काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्य लढ्यातून लोकांत व देशात रुजला. स्वातंत्र्य लढ्यातील संघर्षानं अनेक सामान्य कार्यकर्तेही मोठे झाले, पण त्या छोट्यांचे नेतृत्व करणारी मंडळी थोर होती. दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव, राम मनोहर लोहिया, नाना पाटील हे सर्व एके काळी काँग्रेसचे धुरंधर होते. महाराष्ट्रातील शरद पवार यांनी उभी हयात काँग्रेस पक्षात घालवली. आज अशी माणसे काँग्रेस पक्षात उरली नसतील तर त्यास जबाबदार कोण? प. बंगालात ममता बॅनर्जी, आसामात हेमंत बिस्व सरमा, पुद्दुचेरीत एन. रंगास्वामी हे मूळचे काँग्रेसी असलेले नेते इतरत्र जाऊन मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले, यास जबाबदार कोण? असा सवाल शिवसेनेनं केला आहे.
‘राहुल गांधी संयमी पण एकाकी पडलेला नेता’
काँग्रेस म्हणजे कधीकाळी स्वातंत्र्य आणि संघर्ष होता. आज राहुल गांधींचा लढा हा एकाकी आहे. राहुल गांधी हे त्यांचे काम संयमाने करतात. त्यांच्यावर प्रचंड घाणेरड्या शब्दांत टीका होत असतानाही ते त्यांच्या मुद्द्याला धरुन राहतात. कोरोना काळात राहुल गांधींनी मांडलेल्या अनेक मुद्द्यांवरुन सरकारी पक्षाने टीकेची झोड उठवली. पण लसीकरणापासून पुढे इतर अनेक विषयांत सरकारने राहुल गांधींचीच भूमिका स्वीकारली.
राहुल गांधी हेच आज काँग्रेसचे सेनापती आहेत. त्यांचे सरकारवरील हल्ले अचूक आहेत. जगभरातून भारताला जी परदेशी मदत मिळू लागली आहे, त्यावर सरकारची छाती अकारण गर्वाने फुलली तेव्हा फुगलेल्या छातीचा फुगा राहुल गांधी यांनी सहज फोडला. विदेशी मदतीचा गवगवा करणे म्हणजे राष्ट्राभिमान किंवा स्वाभिमान नाही, असे ते म्हणाले त्यावर मंथन झाले, अशा शब्दांत ‘सामना’च्या अग्रलेखात राहुल गांधी यांचे कौतुक करण्यात आले आहे.
‘विरोधी पक्षांनी ट्विटरच्या फांद्यांवरून उतरुन मैदानात यावे’
सध्याच्या सरकारविषयी लोकांच्या मनात रोष निर्माण होत आहे. बेरोजगारी, अर्थसंकट, महागाई, कोरोनामुळे पडलेल्या प्रेतांचा खच यामुळे केंद्र सरकारची लोकप्रियता घसरणीला लागली आहे. अशावेळी देशभरातील सर्वच विरोधी पक्षांनी ट्विटरच्या फांद्यांवरून उतरून मैदानात आले पाहिजे. सरकारला प्रश्न विचारून भंडावून सोडले पाहिजे. विरोधी पक्षांनी सातत्याने ही गोष्ट केली पाहिजे. यामध्ये काँग्रेसने पुढाकार घ्यावा, असे अग्रलेखात म्हटले आहे.
(Shivsena MP Sanjay Raut hits back congress leader Nana Patole)