राहुल गांधींच्या नकारानंतर काँग्रेसचे अध्यक्षपद पुन्हा सोनिया गांधींकडे
काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सुत्रे अखेर पुन्हा सोनिया गांधींकडे आली आहेत. काँग्रसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा पराभवानंतर राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेसमध्ये नेतृत्त्व कुणाकडे द्यायचे यावरुन जोरदार चर्चा सुरु होती.
नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सुत्रे अखेर पुन्हा सोनिया गांधींकडे आली आहेत. काँग्रसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा पराभवानंतर राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेसमध्ये नेतृत्त्व कुणाकडे द्यायचे यावरुन जोरदार चर्चा सुरु होती. अखेर शनिवारी (10 ऑगस्ट) काँग्रेस कार्यकारीणीच्या बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्षपद गांधी कुटुंबाकडेच राहावे, अशी मागणी झाली. त्यानंतर सोनिया गांधींकडे अंतरिम अध्यक्षपद देण्यात आले.
काँग्रेस कार्यकारीणीच्या बैठकीत अध्यक्षपदाची चर्चा राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या नावापलिकडे गेलीच नाही. काँग्रसच्या नेत्यांनी राहुल गांधींना आपला राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. मात्र, राहुल गांधी त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले आणि त्यांनी राजीनामा मागे घेण्यास नकार दिला. त्यानंतर काँग्रेस कार्यकारीणीने अखिल भारतीय काँग्रेसची सर्वसाधारण निवडणूक होऊन अध्यक्षांची निवड होऊपर्यंत सोनिया गांधींना अंतरिम अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली. सोनिया गांधींनी ही विनंती मान्य करत अंतरिम अध्यक्षपद स्वीकारले, अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली.
सुरजेवाला म्हणाले, “काँग्रेसच्या या बैठकीत काश्मीरच्या मुद्द्यावर देखील चर्चा करण्यात आली. यावेळी काश्मीरची स्थिती नाजूक असल्याचे मत समोर आले. तसेच तेथील स्थितीची माहिती किंवा बातम्या बाहेर येत नसल्याबद्दल काळजी व्यक्त करण्यात आली. सर्वपक्षीय शिष्टमंडळाला काश्मीरला पाठवून तेथील स्थितीची पाहणी व्हावी, अशीही मागणी काँग्रेस करत आहे.”
दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपद गांधी कुटुंबाच्या बाहेर देण्यात येण्याचीही बरीच चर्चा झाली. त्यानंतर अनेक नावे चर्चेत होती. मात्र, या सर्व शक्यता खोट्या ठरल्या. शनिवारी काँग्रेस कार्यकारीणीने देशभरातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यात गांधी कुटुंबापलिकडे चर्चा गेलीच नाही. त्यामुळे काँग्रेसची सुत्रे पुन्हा एकदा गांधी कुटुंबाकडे आली.