सोफा, बाथरूम, टीव्ही अन् चार्जिंगची सोय; मनोज जरांगे यांच्या दिमतीला खास व्हॅनिटी व्हॅन
मनोज जरांगे पाटील हे उद्या सकाळी 9 वाजता मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. यावेळी आमच्यासोबत करोडोच्या संख्येने मराठा समाज जाणार आहे, असा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे. आज अंतरवालीमध्ये मराठा समाज जमा व्हायला सुरुवात झाली आहे. शेकडो लोक अंतरवलीच्या दिशेने येत आहेत. कुटुंबकबिल्यासह मराठा समाज अंतरवलीत एकवटत आहे.
महेंद्र मुधोळकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी | बीड 19 जानेवारी 2024 : अनेकदा उपोषण केलं, इशारे दिले, गावागावात सभा घेतल्या, पण सरकारने काही आरक्षण दिलं नाही. सरकारकडून फक्त शिष्टमंडळ पाठवली गेली. चर्चा केल्या, पण त्यातूनही काहीच हाती आलं नाही. शेवटी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला कूच करायची ठरवली आणि त्याची तयारीही पूर्ण केली आहे. उद्या जालन्याच्या अंतरवली सराटीतून त्यांचा लाँगमार्च मुंबईच्या दिशेने निघणार आहे. त्यासाठी मनोज जरांगे यांनी पूर्ण तयारी केली आहे. जरांगे यांच्या या प्रवासात त्यांच्यासोबत व्हॅनिटी व्हॅन असणार आहे. या सुसज्ज व्हॅनिटीत सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या आहेत.
मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे पाटील हे उद्या आंतरवाली सराटीतून मुंबईकडे कूच करणार आहेत. लाखो मराठा समाज बांधव देखील वेगवेगळ्या वाहनांनी या लाँगमार्चमध्ये सहभागी होणार आहेत. या प्रवासादरम्यान मनोज जरांगे पाटील यांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी आता बीड येथील मराठा आंदोलकांनी खास व्हॅनिटी व्हॅन सज्ज ठेवली आहे. मनोज जरांगे पाटील यांची अचानक तब्येत बिघडत असल्याने ही व्हॅनिटी व्हॅन सज्ज ठेवण्यात आली आहे. या व्हॅनमध्ये दोन कंपार्टमेंट आहेत. त्यात ते आराम करू शकतात. व्हॅनिटीत फ्रिज आहे. अन्न गरम करण्यासाठी ओव्हन आहे. सोफा आहे. चार्जिंगची व्यवस्था आहे. अंघोळीसाठी बाथरूमही आहे. तसेच मोठा टीव्हीही आहे. ही संपूर्ण व्हॅन वातानुकुलित आहे.
म्हणून व्हॅन दिली
मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुंबई ते अंतरवली सराटी हे अंतर मोठं आहे. या दरम्यान सहा मुक्काम आहेत. जरांगे पाटील यांची तब्येत बिघडत असते. दोनवेळी आमरण उपोषण सुरू आहे. ते पाच महिने पायाला भिंगरी बांधून समाजासाठी काम करत आहेत. त्यांची प्रचंड धावपळ झाली आहे. त्यांना पायी चालत जायचं आहे. त्यामुळे त्रास वाढणार आहे. त्यांच्या उपचारासाठी दोन ते तीन डॉक्टर ठेवणार आहे. जरांगे पाटील सांगतील त्या आरोग्याच्या सुविधा त्यात असतील, असं गंगाधर काळकुटे पाटील यांनी सांगितलं. ही व्हॅनिटी व्हॅन पुण्याहून बीडला आणली आहे. आता अंतरवलीला घेऊन जाणार आहे. ही व्हॅनिटी व्हॅन मुक्कामाच्या ठिकाणी राहील. त्यांची काळजी म्हणून हा निर्णय घेतला आहे. आंदोलकांचा मुक्काम हा डोंगर दऱ्यात असणार आहे. जरांगे पाटील यांचा मुक्काम हा व्हॅनमध्ये सावा, त्यांची सुरक्षा राहावी म्हणून ही व्हॅन त्यांना देणार आहे, असं काळकुटे पाटील यांनी सांगितलं.
मोठा फौजफाटा दिमतीला
जरांगे पाटील ज्या रस्त्याने मुंबईला जाणार आहेत त्या रस्त्यावर जालना पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जरांगे पाटील जातील त्या मार्गावर ड्रोन आणि सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. एसआरपीएफची कंपनी, दोन आरसीपीच्या कंपन्या, 10 स्टार्कींग, 700 अंमलदार आणि 200 होमगार्ड असा फौजफाटा जरांगे पाटील यांच्या दिमतीला असणार आहे.