मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers) धडक दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसंच पवारांच्या निवासस्थानावर चपला आणि दगडफेकही करण्यात आली. या संपूर्ण प्रकारामागे अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunratna Sadavarte) यांचा हात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येतोय. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री 8 वाजता गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सदावर्ते यांच्या राहत्या घरातून त्यांनी ताब्यात घेऊन गावदेवी पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. दरम्यान, पोलिसांनी जबरदस्ती केल्याचा आरोप सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी केलाय. दुसरीकडे सदावर्ते यांच्याविरोधात कट रचण्याचं कलम लावण्यात आलं असून त्यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जातेय.
चार ते पाच पोलीस कुठलीही पूर्वकल्पना, नोटीस न देता घरी दाखल झाले. त्यांनी सदावर्ते यांच्याशी धक्काबुक्की केली. तसंत मी आतल्या खोलीत कपडे बदलत असताना महिला पोलीस खोलीत घुसल्या. पोलिसांनी सदावर्ते यांना राजकीय हेतूने प्रेरित होऊन ताब्यात घेण्यात आलं आहे, असा आरोप जयश्री पाटील यांनी केलाय. तसंच सदावर्ते यांची मुलगी झेन हिनेही आपल्याला धक्काबुक्की झाल्याचं माध्यमांसमोर सांगितलं. दुसरीकडे सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर जयश्री पाटील गावदेवी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. यावेळी सदावर्ते यांच्या जीविताला काही झालं तर त्याला शरद पवार, दिलीप वळसे पाटील आणि सुप्रिया सुळे जबाबदार असतील असा आरोपही त्यांनी केलाय. आम्ही पवारांविरोधात सातत्याने बोललो, त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढली, त्यामुळेच सदावर्तेंना ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप जयश्री पाटील यांनी केलाय.
गुणरत्न सदावर्ते यांनीही आपल्याला जीविताला धोका असल्याचा आरोप केलाय. सदावर्ते यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना गावदेवी पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. त्यावेळी माझ्या संवैधानिक अधिकारांवर गदा आणली आहे. प्रोसिजर फॉलो झाली नाही. माझी हत्या होऊ शकते, असा गंभीर आरोप सदावर्ते यांनी केला आहे.
इतर बातम्या :