सरकार स्थापन करताना आमच्या फक्त आग्रही भूमिका, चर्चेला वादविवादाचं स्वरुप नव्हतं; राऊतांच्या गौप्यस्फोटावर काँग्रेसचं स्पष्टीकरण
त्यावेळी आम्ही काही गोष्टी आग्रहाने मागत होते. या चर्चेला वाद-विवादाचं स्वरुप नाही तर आग्रही स्वरुप असायचं, असं स्पष्टीकरण बाळासाहेब थोरात यांनी दिलं आहे. (Balasaheb Thorat Mahavikas Aghadi)
मुंबई : “सरकार स्थापन करण्यात येत होतं ते 36 दिवस ऐतिहासिक आहेत. यावेळी सरकार स्थापन करताना अनेक वेळा बैठका झाल्या. त्यावेळी काही गोष्टी आम्ही आग्रहाने मागत होते. या चर्चेला वादविवादाचं स्वरुप नाही तर आग्रही स्वरुप असायचं,” असं स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी दिलं. काँग्रेस नेते मल्लीकार्जून खर्गे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना शाब्दिक चकमक झाली होती, असा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला. याविषीयी ते मुंबईत ”टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. (statement of Balasaheb Thorat on clash in Mahavikas Aghadi while forming government)
महाविकास आघाडी सरकारला स्थापन होऊन 28 नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण झालं. त्यानिमित्त शिवसेना खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाविकासआघाडी सरकार स्थापनेच्या काळातील मोठे गौप्यस्फोट केले आहेत. ‘सामना’तील रोखठोक या सदरात राऊतांनी ‘मुंबईत नेहरू सेंटरमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तत्कालीन काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. विधानसभेचे अध्यक्षपद कुणाकडे? हा यातील शाब्दिक चकमकीचा मुद्दा होता, असा मोठा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला. त्यांच्या या गौप्यस्फोटानंतर राज्याच्या राजकीय पटलावर अनेक चर्चा रंगल्या आहेत. यावर बोलताना आमच्यात वादविवाद नाही झाला, तर आमच्या मागण्या आग्रही स्वरुपाच्या होत्या, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
“सरकार स्थापन करतानाचे ते 36 दिवस ऐतिहासिक आहेत. या दिवसांवर चार पुस्तकं येतात. याचा अर्थ या दिवसांचे महत्त्व सर्वांनी ओळखून घ्यायला पाहिजे. तीन पक्षांच्या विचारधारा वेगवेगळ्या आहेत. वेगळी विचारधार असणारे पक्ष एकत्र येतात त्यावेळी संवाद होणार हे साहजिक आहे. हे सरकार स्थापन करताना अनेक वेळा बैठका झाल्या. या बैठकांमध्ये आम्ही काही गोष्टी आग्रहाने मागत होतो. तर काही गोष्टींसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा आग्रह होता. आमच्यातील चर्चा वादविवाद स्वरूपाच्या नसायच्या. चर्चांमध्ये आमच्या मागण्यांना आग्रही स्वरूप असायचं. चर्चेला कुणी चकमक का म्हटलं हे मला माहीत नाही.” असं बालासाहेब थोरात म्हणाले. तसेच, या आधीच सरकार स्थापनेवर चार पुस्तकं आलेली आहेत. त्यामुळे आणखी काही नवीन बोलून नवा इतिहास तयार करायची मला गरज नाही, असे म्हणत थोरात यांनी त्यांची भूमिका मांडली.
संजय राऊत यांच्या रोखठोकमध्ये नेमकं काय?
मुंबईत नेहरू सेंटरमध्ये झालेल्या महाविकासआघाडीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तत्कालीन काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. विधानसभेचे अध्यक्ष पद कुणाकडे? हा यातील शाब्दिक चकमकीचा मुद्दा होता, असा मोठा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात इतका रंगतदार आणि अखेरच्या चेंडूपर्यंत खेळला जाणारा सामना कधीच झाला नव्हता. नेहरू सेंटरमधील ठिणगी असे एखादे सरकार येईल असा विश्वास जसा काँग्रेसला नव्हता तसा शिवसेनेच्या नवनियुक्त आमदारांनाही नव्हता. शरद पवार आणि माझ्यात 35 दिवस सुरू असलेल्या गाठीभेटी हा निव्वळ टाईमपास आहे असा अपप्रचार सुरू झाला. 17 नोव्हेंबरला सकाळी पत्रकारांनी मला विचारले, ‘‘तुमच्याकडे किती आमदारांचे पाठबळ आहे?’’ तेव्हा ‘‘आमचा आकडा 170 आहे’’ असे मी सांगितले. त्या 170 आकडय़ाची खिल्ली उडवण्यात आली. तोपर्यंत सरकार स्थापनेसंदर्भात काँगेसचा स्पष्ट होकार आला नव्हता, पण अहमद पटेलांसारखे नेते सकारात्मक बोलत होते, असेही राऊत म्हणाले.
VIDEO : Special Report | “आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा याद राखा”, मराठा आरक्षणावरून उदयनराजे आक्रमकhttps://t.co/D1DDwp1Fx6
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 29, 2020
संबंधित बातम्या :
शरद पवार-मल्लिकार्जुन खरगेंमध्ये वाद; संजय राऊतांच्या ‘त्या’ गौप्यस्फोटावर रोहित पवार म्हणतात…
संजय राऊत यांच्या नातेवाईकांनाही ईडीच्या नोटिसा, नितेश राणेंचा खळबळजनक दावा
(statement of Balasaheb Thorat on clash in Mahavikas Aghadi while forming government)