अशोक चव्हाणांच्या बंगल्याच्या दिशेने दगड फेकला, सुरक्षा कक्षाचं मोठं नुकसान
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan Bungalow) यांच्या बंगल्यावर दगड फेकण्यात आल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. नांदेडमधील (Nanded) बंगल्यावर एका महिलेने दगड फेकला.
नांदेड : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan Bungalow) यांच्या बंगल्यावर दगड फेकण्यात आल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. नांदेडमधील (Nanded) बंगल्यावर एका महिलेने दगड फेकला. ही महिला रस्त्यावरुन भांडत जात होती, त्यावेळी तिने फेकलेला दगड अशोक चव्हाणांच्या बंगल्याच्या दिशेने आला. त्यातील एक दगड मंत्र्यांच्या बंगल्यावर लागला.
या दगडफेकीमुळे अशोक चव्हाण यांच्या सुरक्षा कक्षाच्या काचेचं नुकसान झालं आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी मोठा फौजफाटा घेत अशोक चव्हाणांच्या बंगल्याकडे धाव घेतली.
दरम्यान, पोलिसांनी अधिक चौकशी केली असताना, संबंधित महिला तिच्या एका साधीदारासोबत भांडत होती. त्यावेळी ते दोघे एकमेकांवर दगडफेक करत होते. दोघांच्या भांडणाच्या नादात फेकलेला दगड अशोक चव्हाणांच्या बंगल्याच्या दिशेने आला. त्यामुळे सुरक्षा कक्षाच्या काचेचं नुकसान झालं.
एकमेकांवर दगड फेकणाऱ्या त्या महिलेसह तिच्या साथीदाराचा पोलीस सध्या शोध घेत असून याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करतायत.
नेमकं काय घडलं?
रस्त्याने जाणारी एक महिला जोरजोरात भांडत जात होती. ती आरडाओरडा करत होती. त्याचवेळी ती दगडही फेकत होती. ती नेमकं कुणाला दगड मारतेय हे समजत नव्हतं. पण जो हातात येईल तो दगड घेऊन ती जोरात फेकत होती. दगड फेकताना जोरजोरात भांडत होती. ती ज्याला दगड मारत होती, तो तिच्या ओळखीचाच कोणीतरी होता.
त्याच्या दिशेने तिने अनेक दगड मारले. हे फेकलेले दगड त्या व्यक्तीला लागला की नाही याची माहिती मिळाली नाही. पण या महिलेने फेकलेला एक दगड, थेट अशोक चव्हाण यांच्या बंगल्याच्या दिशेने आला. हा दगड अशोक चव्हाण यांच्या बंगल्याच्या सुरक्षा कक्षावर येऊन आदळला. हा इतका मोठा फटका होता, की त्यामुळे सुरक्षा कक्षाची मोठी काच पूर्णपणे फुटली.
VIDEO : अशोक चव्हाण यांच्या घरावर महिलेने दगड फेकला
संबंधित बातम्या
खासदार संभाजी छत्रपती सर्व पक्षीय खासदारांसह राष्ट्रपतींना भेटणार; मराठा आरक्षणावर तोडगा निघणार?