2018 स्पेशल : बारामतीत पवारांची ताकद आणखी वाढली
बारामती : 2018 या वर्षात स्थानिक पातळीपासून ते अगदी देश पातळीवर अनेक राजकीय घडामोडी घडल्या, ज्यांनी पुढील समीकरणं बदलली. टीव्ही 9 मराठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय घडामोड देण्याचा प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं होमग्राऊंड असलेल्या बारामतीतही अशीच एक घडामोड 2018 या वर्षात घडली, ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मजबुतीसाठी आणखी बळ मिळालं आहे. […]
बारामती : 2018 या वर्षात स्थानिक पातळीपासून ते अगदी देश पातळीवर अनेक राजकीय घडामोडी घडल्या, ज्यांनी पुढील समीकरणं बदलली. टीव्ही 9 मराठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय घडामोड देण्याचा प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं होमग्राऊंड असलेल्या बारामतीतही अशीच एक घडामोड 2018 या वर्षात घडली, ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मजबुतीसाठी आणखी बळ मिळालं आहे.
तुतारीची… हलगीचा उंच स्वर… लेझीमचा ताल… रांगोळी.. फुलांचा सडा आणि भव्य मिरवणूक.. अशा आगळ्यावेगळ्या वातावरणात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काकडे गटाच्या निंबूत गावात 16 डिसेंबर रोजी जंगी स्वागत करण्यात आलं.. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीच्या प्रारंभापासून विळ्याभोपळ्याचं नातं असलेल्या काकडे गटाने राजकीय विरोधाला पूर्णविराम देत नव्या राजकीय नांदीचा प्रारंभ केला.
काकडे-पवार या 50 वर्षांतील कट्टर विरोधकांचे मनोमीलन पाहायला हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. शरद पवार यांच्या 1967 च्या पहिल्या निवडणुकीपासून पवार-काकडे या गटातील राजकीय वादाला सुरुवात झाली. यानंतर सगळ्याच निवडणुकांमध्ये दोघांत लढती झाल्या. अजित पवार राजकारणात आल्यानंतर शेतकरी कृती समितीकडून सतीश काकडे यांना कारखाना आणि जिल्हा परिषद गटात कायम कडवी लढत दिली.
2016 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीकडून प्रमोद काकडे उभे राहिल्याने सतीश काकडे यांनी तलवार म्यान केली. त्यानंतर त्यांच्या पवारांशी वाढत गेलेल्या जवळकीचा परिणाम म्हणून अजित पवार 20 वर्षांनी निंबूत गावात कार्यक्रमासाठी गेले. तब्बल 16 उद्घाटने पवार यांनी केली. आकर्षण होते ते जिप्सीतून मिरवणुकीचं… प्रमोद काकडे यांनी सारथ्य केलं.
सतीश काकडे पवारांशेजारी उभे होते. त्यांच्यासोबत अजित पवारांपासून 2015 च्या कारखाना निवडणुकीत दुरावलेले सोमेश्वरचे माजी अध्यक्ष शहाजी काकडेही होते. त्यांचीही यानिमित्ताने राष्ट्रवादीत घरवापसी अधोरेखित झाली.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील पदाधिकारीही उपस्थित होते. सध्या सतीश काकडे यांनी कुठल्याही प्रकारे राष्ट्रवादीत प्रवेश केला नसला तरी पवार यांच्याशी झालेल्या जाहीर सलगीने बारामती आणि पुरंदरच्या राजकारणाची सूत्रे बदलणार अशीच चर्चा होती.
राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडतात. पण बारामतीत ही 2018 वर्षातली महत्त्वाची घडामोड म्हणता येईल. कारण, गेल्या 50 वर्षांचं शत्रूत्व विसरुन दोन राजकीय मित्र एकत्र आले.
पवार-काकडे गटाचा वाद
शरद पवार यांच्या राजकीय प्रवेशापूर्वी आधी काकडे गटाचं पुणे जिल्ह्यात प्राबल्य होतं. मात्र 1967 साली शरद पवार यांना विधानसभेची उमेदवारी मिळाल्यापासून काकडे-पवार यांच्यात सत्तासंघर्ष सुरु झाला. 1967 साली पहिल्याच विधानसभा निवडणुकीत बाबालाल काकडे यांनी शरद पवारांविरोधात दंड थोपटत या संघर्षाला सुरुवात केली. हा संघर्ष दोन पिढ्यांपर्यंत सुरु राहिल्यानंतर सतीशराव काकडे, शहाजीराव काकडे आणि प्रमोद काकडे यांच्या माध्यमातून याला पूर्णविराम मिळाला. त्याचवेळी अजित पवार यांची डोकेदुखीही कायमची संपली आहे.