नितेशची उमेदवारी मागे घेऊन शिवसेनेची माफी मागा : सुभाष देसाई
माफी मागायची असेल, तर नितेशची उमेदवारी मागे घ्या, असं शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई (Subhash desai sindhudurg speech) यांनी नारायण राणेंना आपल्या भाषणातून सांगितले.
सिंधुदुर्ग : माफी मागायची असेल, तर नितेशची उमेदवारी मागे घ्या, असं शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी नारायण राणेंना आपल्या भाषणातून सांगितले. आज (16 ऑक्टोबर) सिंधुदुर्गातील कणकवली येथे शिवसेनेकडून उमेदवार सतीष सावंत यांच्यासाठी प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित होते.
काल एका कुटुंबाचा स्वाभिमान गहाण पडला. दादा कोंडके असते तर म्हणाले असते, लबाड लांडगं ढोंग करतंय. माफी मागायची असेल तर नितेशची उमेदवारी मागे घ्या आणि मग माफी मागा. नारायण राणे पक्षासाठी वरदान ठरणार नाही, तर खुर्ची खालचा बॉम्ब ठरेल. देवेंद्र फडणवीस सावध राहा, असं सुभाष देसाई म्हणाले
सध्या शिवसेनेच्या जाहिरनाम्याचीच चर्चा सुरु आहे. तो आमचा जाहीरनामा नाही, तर वचननामा आहे. अतिशय विचाराने 10 रुपयाच्या थाळीची योजना आणली असून आणि ती अंमलात आणणारच. शिवेसेना वचननाम्यातील एकूण एक गोष्ट अंमलात आणणारच, असंही सुभाष देसाई म्हणाले.
दरम्यान, नारायण राणेंनी काल (15 ऑक्टोबर) कणकवलीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपल्या स्वाभीमानी पक्षाचे विलनीकरण केले. त्यासोबतच पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपातून सध्या नितेश राणे यांना कणकवली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. नीतेश राणेंना आव्हान देण्यासाठी शिवसेनेकडूनही सतीष सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे कणकवली मतदारसंघात कडवी लढत युतीत दिसत आहे