नांदेड : देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाला लागला असून काँग्रेस उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी ही निवडणूक जिंकली आहे. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुभाष साबने यांचा 41 हजार 933 मतांनी पराभव झालाय. विशेष म्हणजे हा पराभव भाजपसाठी मोठा धक्का असल्याचे माणले जात आहे. असे असले तरी साबने यांनी जनतेने दिलेला कौल मान्य असल्याचे म्हटले आहे. माझ्यावर कोणताही शिवसैनिक नाराज असल्याचे मला प्रचारादरम्यान दिसले नाही. या पराभवाने खचून न जाता भाजपातच राहू. तसेच पुढच्या निवडणुकीसाठी पुन्हा जोमाने कामाला लागू, असं सुभाष साबने यांनी म्हटलंय. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
“जनतेने दिलेला कौल आम्ही मान्य करतो. कोणाला निवडून द्यायचं हे जनतेच्या हातात असते. त्यामुळे हा निकाल आम्ही नम्रपणे स्वीकारलेला आहे. या निवडणुकीत ज्या उणिवा राहिल्या त्यावर कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा केली जाईल. भविष्यात आमचा पराभव होणार नाही, असी रणनीती आगामी काळात केली जाईल,” असे साबने म्हणाले.
तसेच त्यांनी निवडणुकीत नेमकं काय चुकलं, कुठे फटका बसला तसेच त्यांच्या पक्षांतरावर प्रतिक्रिया दिली. “शिवसैनिक माझ्यावर नाराज आहेत, असं मला प्रचारदरम्यान कुठेही वाटलं नाही. मी भाजपमध्ये आलो. भाजपचा एखादा गट नराज आहे, असे कुठेही दिसले नाही. एक टीम म्हणून आम्ही प्रचार केला. मी आता जिथे आहे तिथेच राहणार आहे,” असे साबणे यांनी स्पष्ट केलं. तसेच वंचित बहुजन आघाडीचा फटका भाजपला बसला. वंचित बहूजन आघाडीने जी मतं घ्यायला हवी होती ती घेतली नाही. त्यामुळे मोठा फटका बसला, असंही साबने म्हणाले.
दरम्यान, बिलोली देगलूर पोटनिवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला असून काँग्रेसचा मोठा विजय झाला आहे. येथे जितेश अंतापूरकर विजयी झाले आहेत. जितेश अंतापूरकर यांना 1 लाख 8 हजार 789 मते मिळाली. तर भाजप उमेदवार सुभाष साबने यांना 66 हजार 872 मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उत्तम इंगोले यांनी 11 हजार 347 मते घेतली. जितेश अंतापूरकर यांनी भाजप उमेदवार सुभाष साबने यांच्यावर 41 हजार 933 मतांनी विजय मिळवला आहे. यावरून महाविकास आघाडीची ताकद वाढल्याचं दिसून येत आहे.
इतर बातम्या :
मुंबईत पुन्हा एनसीबीची कारवाई, विलेपार्ले परिसरातून कोट्यवधींचे हेरॉईन जप्त
Bypoll Election Result | तीन जागांवर 3 पक्षांचे उमेदवार विजयी, लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये कोणाची सरशी ?