रक्षाबंधनाची अनोखी भेट, 17 कोटी मागितले, 20 कोटी मिळाले
रक्षाबंधनाला भाऊ आपल्या बहिणीला भेट देतो, ती कधी पैशाच्या स्वरुपात असते, तर कधी वस्तूंच्या स्वरुपात. पण नागपुरातील महिलांना मिळालेली रक्षाबंधनाची भेट कधीही न विसरण्यासारखी आहे.
नागपूर : रक्षाबंधनाला (Raksha Bandhan) भाऊ आपल्या बहिणीला भेट देतो, ती कधी पैशाच्या स्वरुपात असते, तर कधी वस्तूंच्या स्वरुपात. पण नागपुरातील महिलांना मिळालेली रक्षाबंधनाची भेट (Raksha Bandhan gifts) कधीही न विसरण्यासारखी आहे. कारण रक्षाबंधन भेट (Raksha Bandhan gifts) म्हणून नागपुरातील (Nagpur) महिलांना 10 किंवा 20 लाख नाही, तर तब्बल 20 कोटी रुपये मिळाले आहेत.
महिलांच्या हातातही उद्योगाची सूत्र यावीत, म्हणून नागपुरात महिला उद्योजिका भवनाची (Udyog bhavan) पायाभरणी सुरु आहे. 17 कोटी रुपयांचं बजेट असलेल्या या भवनसाठी राज्य सरकारने यापूर्वी 10 कोटी रुपये मंजूर केलेत. पण 7 कोटींची तूट भासत होती. या भवनाच्या भूमीपुजनासाठी नागपुरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्याकडे बहिणींसाठी रक्षाबंधनांची ओवाळणी म्हणून सात कोटी रुपयांची मागणी केली आणि या अनोख्या रक्षाबंधन भेटीचा प्रवास सुरु झाला.
नागपुरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं भाषण सुरु झालं. त्यांच्याकडून सात कोटी रुपये रक्षाबंधन भेट मागण्यात आली. पण त्यांनी मोठ्या मनानं सात कोटींऐवजी 10 कोटी रुपये देण्याची घोषणा केली.
रक्षाबंधनाची भेट म्हणून नागपुरातील बहिणींना आता 10 कोटी मिळाले, त्यामुळे महिला उद्योजिका भवनची गरज पूर्ण झाली. पण याच कार्यक्रमात प्रमुख पाहुणे असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही भाषणादरम्यान महिलांना त्यांच्या लघू आणि सूक्ष्म उद्योग मंत्रालयाकडून 10 कोटी रुपयांची ओवाळणी देऊ केली.
नागपुरातील या बहिणींना फक्त ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट राहिली होती. मग नितीन गडकरी यांनी रक्षाबंधन भेट म्हणून बावनकुळे यांनी महिला उद्योजीका भवनला सोलर पॅनल लावून द्यावे, अशी मागणी केली.
अशाप्रकारे नागपूरमध्ये होऊ घातलेल्या 17 कोटींच्या महिला उद्योजिका भवनसाठी 20 कोटी रुपये रक्षाबंधन भेट म्हणून मिळाले. त्यामुळे आता ही रंक्षाबंधनाची अनोखी भेट शहरातील लाखो बहिणींच्या हाताला काम मिळवून देणार आहे.
मात्र रक्षाबंधनाची ही भेट महिलांच्या हितासाठी असल्याने समाजात एकीकडे याचं कौतुक होतंय, पण सध्या विधानसभा निवडणूकीचं असल्यानं ही खैरात तर नाही ना? असा प्रश्नही विरोधक उपस्थित करत आहेत.