मोठा भाऊ मानता मग त्यांचं ऐकून चर्चा करा, सुधीर मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी (Sudhir Mungantiwar on Uddhav Thackeray) शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील आरोपांना उत्तरे दिली आहेत.
मुंबई: भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी (Sudhir Mungantiwar on Uddhav Thackeray) शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील आरोपांना उत्तरे दिली आहेत. उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदी यांना मोठा भाऊ मानत असतील, तर छोटा भाऊ म्हणून त्यांनी मोठ्या भावाचं ऐकावं आणि सत्तास्थापनेसाठी चर्चा करावी, असा सल्ला सुधीर मुनगंटीवार यांनी (Sudhir Mungantiwar on Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांना दिला. यावेळी त्यांनी भाजपवरील खोटारडेपणाचा आरोपही फेटाळला.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “शिवसेनेचा खोटारडेपणाचा आरोप आम्ही फेटाळतो. विधानसभा निवडणुकीत ही गोष्ट कधीही पुढे आली नाही. निकालानंतर अचानक पत्रकार परिषद घेऊन सर्व पर्याय खुले असल्याची भाषा करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी मानलेल्या भावाबद्दल मन कलुषित करणारी वक्तव्यं कोणी केली हे पाहावं. ते जर मोदींना मोठा भाऊ मानत असतील तर त्यांनी मोठ्या भावाचं ऐकून सत्तास्थापनेसाठी चर्चा सुरू करावी.”
भाजपचं सत्तेवर नाही, तर सत्यावर प्रेम आहे. आमच्या पक्षाच्या नावातच पहिला शब्द भारतीय आहे. त्यानंतर जनता आणि मग पक्ष. त्यामुळे आमचं स्वप्न वंचितांचा, दिनदुबळ्याचा विकास करणं हा आहे. भाजपला खोटं ठरवण्याआधी त्यांनी विचार करावा. भाजपनं अजून दुसऱ्या पर्यायाचा विचार केलेला नाही. शिवसेनेकडून जनतेने दिलेल्या कौलाचा अनादर होत आहे, असंही मुनगंटीवार यांनी नमूद केलं.
‘सत्तेत राहून मित्रपक्षांनी मोदी-शाहांवर कधीही टीका केली नाही’
सत्तेत राहून मोदी किंवा शाह यांच्यावर मित्रपक्षांनी कधीही टीका केलेली नाही. सत्तेत राहून धोरणावर टीका करण्यापेक्षा मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा करायला हवी. सत्तेत राहून त्यांनी नेहमीच मोदी-शाह यांच्याविरोधात चुकीचं बोललं, असाही आरोप मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर केला.