बाळासाहेबांकडून उद्धव यांनाच शिवसेना कशी मिळाली? इतर भावांचं काय? सुधीर मुनगंटीवारांचा प्रश्न, संजय राऊत यांचं उत्तर काय?
उद्धव ठाकरे वारंवार म्हणत आहेत, माझ्या वडिलांचा पक्ष आहे. मग इतर जे दोन भाऊ आहेत. त्यांच्या परिवारातील लोकांचं काय ?... असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय.
मुंबईः शिवसेना (Shivsena) हा पक्ष माझ्या वडिलांचा, बाळासाहेब ठाकरे यांचा आहे, हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) वारंवार सांगत आले आहेत. याच मुद्द्यावरून त्यांना घेरण्यात आल्याचं दिसून येतंय. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Election Commission) झालेल्या मागील सुनावणीत यावरूनच प्रश्नचिन्ह उभारण्यात आलं. आजच्या सुनावणीतदेखील हाच मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यावरूच प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, उद्धव ठाकरे वारंवार म्हणत आहेत, माझ्या वडिलांचा पक्ष आहे. मग इतर जे दोन भाऊ आहेत. त्यांच्या परिवारातील लोकांचं काय ?… पक्षातील दोन तृतीयांश सदस्यांचं मत शिंदे यांच्या बाजूने आहे. निवडणूक आयोगाने सर्व बाजू ऐकून सत्याच्या बाजूने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
संजय राऊतांचं उत्तर काय?
शिवसेना कुणाची हा तांत्रिक मुद्दा निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतो. निवडणूक आयोगाने मागच्या काळात ज्या पद्धतीने निर्णय दिले, यावरून काय होतंय याचा अंदाज येतोय. शिवसेना कुणाची हा प्रश्न महाराष्ट्रात तरी उपस्थित होत नाही. शिवसेना एकच आहे. बाळासाहेब ठाकरेंची. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील… अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
विनायक राऊत काय म्हणाले?
शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणाले, ‘ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंनी दिलेल्या एबी फॉर्मवर निवडणूक लढले आहेत. त्यांच्या अपरोक्ष हे कसे काय पक्ष प्रमुख म्हणवू शकतात हे कायद्याच्या विरोधात आहे.. पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
आज सुनावणी कधी?
शिवसेना पक्ष आणि शिवसेनेच्या चिन्हाबाबत आज महत्त्वाची सुनवाणी केंद्रीय निवडणूक आयोगसमोर होणार आहे. दुपारी चार वाजेच्या सुमारास सुनावणीला सुरुवात होईल. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष हा बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर अवैधरित्या मिळवल्याचा दावा शिंदे गटाच्या वकिलांनी मागील सुनावणीच्या वेळी केला आहे.
त्यातच येत्या 23 जानेवारी रोजी उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील प्रतिनिधी सभेतील सदस्यांची निवडणूक घेण्याची परवानगी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. परवानगी नाही दिली तर शिवसेना प्रमुख पदाची मुदत वाढ द्यावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या वतीने करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या मागणीवर निवडणूक आयोग काय निर्णय घेते, याकडे सर्वांचं लक्ष लागंलय.