Vande Mataram | ‘वंदे मातरम्’ ला नकार दिल्यास जेलमध्ये नाही टाकणार, पण भारतभूमीच्या वंदनाला विरोध का? सुधीर मुनगंटीवारांचा सवाल
एखादा विरोधक आहे, म्हणून त्याला मी कमी लेखणार नाही. फक्त वंदे मातरम् चं महत्त्व अभियानाच्या माध्यमातून पोहोचवण्याचा उद्देश आहे. यातून महाराष्ट्रातील कमीत कमी अर्धा कोटी विद्यार्थी-विद्यार्थिनी, युवक जोडले जावेत. 26 जानेवारीपर्यंत हे अभियान पुढे जावं, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
मुंबईः वंदे मातरम् (Vande Mataram) म्हणण्यास कुणी नकार दिल्यास लगेच जेलमध्ये टाकणार नाही. मात्र भारतभूमीच्या वंदनाला उगाच विरोध कशासाठी करायचा, असा सवाल महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केला आहे. देशाच्या स्वातंत्र्यदिनी मुनगंटीवार यांनी फोनवरून बोलताना संवादाची सुरुवात करतेवेळी हॅलो या शब्दाऐवजी वंदे मातरम् म्हणावे, असे आवाहन महाराष्ट्रातील जनतेला केले. विशेष म्हणजे राज्यातील सरकारी कर्मचारी फोनवर संभाषण करतानाची सुरुवात वंदे मातरम् ने करतील, असेही त्यांनी सांगितले. यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी मुनगंटीवारांवर निशाणा साधला होता. या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला असल्याची टीका केली जातेय. आता श्वास घेतानाही तुम्हाला विचारून घ्यायचा का, असा सवाल आव्हाड यांनी केला होता. मात्र मुनगंटीवारांनी विरोधकांच्या भूमिकेवर आज प्रतिक्रिया नोंदवली.
काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?
वंदे मातरम् म्हणण्यास विरोध करण्यांना उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘ मी महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून हा निर्णय घेतला आहे. कोणत्या पक्षाचं काय मत आहे, माझ्या दृष्टीने गौण आहे. महाराष्ट्राच्या जनतेने ही सवय लावून घ्यावी. देशभक्तांच्या ओठावरचं वेदमंत्राहून आम्हा… वंद्य वंदे मातरम् हे शब्द हॅलोला पर्यायी म्हणून यावेत. लोकशाहीत ते विरोध करतील. आम्हाला मतपरिवर्तन , मन परिवर्तन करावं लागेल. माझ्या स्वतःतही बदल करावं लागेल. हॅलो शब्द इतका रूढ झालाय. की सहजतेने हा जाणारा नाही. प्रयत्नपूर्वक काही शब्द रूढ होतात. यात राजकारण असण्याचं कारण नाही. संविधानाने या पहिल्या कडव्याला राष्ट्रगानाचा दर्जा आहे. त्यामुळे वंदे मातरम् ला विरोध करणं…. ही भूमिका योग्य नाही. एखादा विरोधक आहे, म्हणून त्याला मी कमी लेखणार नाही. फक्त वंदे मातरम् चं महत्त्व अभियानाच्या माध्यमातून पोहोचवण्याचा उद्देश आहे. यातून महाराष्ट्रातील कमीत कमी अर्धा कोटी विद्यार्थी-विद्यार्थिनी, युवक जोडले जावेत. 26 जानेवारीपर्यंत हे अभियान पुढे जावं, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
जितेंद्र आव्हाडांचा आक्षेप काय?
हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणण्याच्या अभियानावर टीका करताना जितेंद्र आव्हाडांनी संताप व्यक्त केला. भारतीय संस्कारांमध्ये नमस्कार करण्याची परंपरा आहे. अनेक जण जय भीम म्हणतात. पोलीस अधिकारी जय हिंद म्हणतात. पण भारतात स्वातंत्र्य आहे. लोकांना मोकळा श्वास घेऊ द्यावा. आता तो सुद्धा तुम्हाला विचारून घ्यायचा का, असा सवाल त्यांनी केला. तसेच यानंतर तुम्हाला आता सुधीरभाऊ या नावानेही हाक मारायची… असेही तुम्ही जाहीर कराला… अशी लीस्टच जाहीर करून टाका, असं वक्तव्य आव्हाड यांनी केलं.
‘खातेवाटपावर शिवसेनेने बोलू नये…’
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शिवसेना-भाजप युतीतील मंत्र्यांचे नुकतेच खातेवाटप झाले. मात्र यात भाजपच्या वाट्याला महत्त्वाची खाती आल्याचा आरोप मूळ शिवसेनेकडून करण्यात येतोय. याला उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, ‘ शिवसेनेकडे जी खाती होती, तिथेच आहेत. भाजपकडे जी खाती आहेत, ती शिवसेनेने चिंतन-मंथन करून आम्ही घेतली. शिवसेनेनी यावर टीका करणं म्हणजे स्वतःच्या क्षमतेबाबत राजकीय निर्णय घेण्याची क्षमता नाही. स्वतःचीच निंदा करून घेण्यासारखे आहे.