Suhas Kande : दुबईहून आणलेल्या जाड चपला झिजल्या, पण आदित्य ठाकरे काही भेटले नाही; सुहास कांदेंची टीका सुरूच
राज्यात सत्तांतर तर झालेच पण कामाच्या पध्दतीमध्येही बदल झाला आहे. जिथे 100 पत्र आणि माझ्या चपला झिजल्या तिथे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होताच दुसऱ्या दिवशी विकास कामांना परवानगी मिळाली असल्याचे कांदे यांनी सांगितले आहे. त्यामुळे ही पध्दत त्यांची राहिली नाही. त्यामुळे आज पक्ष संघटनासाठी थेट रस्त्यावर उतरावे लागत आहे.
नाशिक : शिंदे गटातील (Suhas Kande) आ. सुहास कांदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेवरुन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तर आरोप केलेच पण त्यानंतरही त्यांच्या टिकेचे बाण हे सुरुच आहेत. शिवसेनेतील आमदारांनी बंडाची भूमिका घेतल्यानंतरच (Aditya Thackeray) आदित्य ठाकरे हे (Nashik) नाशिक दौऱ्यावर आले आहेत. त्या दरम्यान, कांदे यांनी आता थेट पक्षप्रमुख आणि आदित्य ठाकरे यांच्यावरच आरोप करण्यास सुरवात केली आहे. मतदार संघातील विकासाबाबत आपण आदित्य ठाकरे यांना 100 पत्रं दिले. पण त्यांच्याकडून एकाही पत्राला उत्तर मिळाले नाही. त्यांच्या या भूमिकेमुळेच मतदार संघातील योजना तर रखडल्या पण पाठपुरावा करुन-करुन मी दुबईहून आणलेल्या चपला देखील झिजल्या असा टोलाही कांदे यांनी मनमाडमध्ये लगावला आहे. आतापर्यंत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर थेट आरोप केले जात नव्हते पण आता आदित्य ठाकरे थेट मतदार संघात आल्यापासून कांदे यांचा सूर बदलला आहे.
गरजेच्या वेळी दुर्लक्ष केल्यानेच ही वेळ
आमदारांच्या भेटीगाठी आणि वेळच्या वेळी विकासकामे झाली असती तर आज परस्थिती वेगळी राहिली असते. असे म्हणत सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मतदार संघाला विकास कामाची गरज असताना अनेक हेलपाटे मारले पण दिलेल्या पत्रावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. विकास कामाबाबत आपण 100 पत्र ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना दिले होते. पण पदरी केवळ निराशाच पडली असल्याचेही कांदे म्हणाले. आदित्य नाशिक दौऱ्यावर असतनाच त्यांनी हे आरोप केले आहेत.
आता कामाचे स्वरुप बदलले, दुसऱ्याच दिवशी परवानगी
राज्यात सत्तांतर तर झालेच पण कामाच्या पध्दतीमध्येही बदल झाला आहे. जिथे 100 पत्र आणि माझ्या चपला झिजल्या तिथे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होताच दुसऱ्या दिवशी विकास कामांना परवानगी मिळाली असल्याचे कांदे यांनी सांगितले आहे. त्यामुळे ही पध्दत त्यांची राहिली नाही. त्यामुळे आज पक्ष संघटनासाठी थेट रस्त्यावर उतरावे लागत आहे. योग्यवेळी योग्य निर्णय न घेतल्यानेच ही वेळ आल्याचे कांदे म्हणाले आहेत.
ठरलं एक आणि झालं एक
बंडखोर आमदार हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर तर टिका करीत आहेतच पण हे सर्व होण्यामागे राष्ट्रवादीला जाबाबदार धरत आहेत. महाविकास आघाडी सरकारची स्थापना होताना देखील एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होणार असे ठरले होते. शेवटच्या मिनिटांपर्यंत हे असेच होते. पण ऐन वेळी शरद पवार यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले. कारण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले तर सेना फुटेल हे देखील शरद पवारांना माहित होते. म्हणूनच त्यांनी असे केल्याचा आरोप कांदे यांनी केला आहे.