“मला अजिबात मंत्रिपद नकोय, फक्त…”, शिंदेगटाच्या नेत्याचं विधान काय? कुणाची मागणी?
शिंदेगटाच्या आमदाराने मंत्रिपदाबाबत भाष्य केलंय.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), मंत्री, खासदार, आमदार आणि शिंदे गटाचे अन्य नेते गुवाहाटीला गेलेत.यावेळी जाताना आमदारांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या तर कुणी मंत्रिपदाची महत्वकांक्षा बोलून दाखवली. यावेळी आम्ही नांदगावचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्याशी आम्ही संवाद साधला तेव्हा त्यांनी मंत्रिपदावर आपलं मत मांडलं.
मला कुठल्याही मंत्रिपदाची अपेक्षा नाही. मला मंत्रिपद मिळावी, ही माझी महत्वकांक्षा अजिबातच नाही. फक्त माझ्या नांदगाव मतदारसंघाचा विकास व्हावा, एवढीच माझी इच्छा आहे, असं सुहास कांदे म्हणालेत.
कांदे नाराज असल्याचं बोललं जात होतं. त्याबाबत त्यांना विचारलं असता, मी नाराज नाही. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. त्यांचं काम चांगलं आहे. माझ्या मतदारसंघाचा विकास व्हावा एवढीच माझी अपेक्षा आहे, असं सुहास कांदे म्हणालेत.
मंत्रिपदावर गोगावलेंचा दावा
शिंदेगटाचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी मंत्रिपदावर दावा केलाय. पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात मी मंत्रिपदाची शपथ घेईल, असं गोगावले म्हणालेत. खात्याबाबत विचारलं असता एकनाथ शिंदे देखील त्या खात्याची जबाबदारी मी घेईल, असं गोगावले यांनी सांगितलं आहे.
शिंदेगटाच्या बंडावेळी अत्यंत महत्वाचं ठरलेलं ठिकाण म्हणजे गुवाहाटी. इथूनच महाराष्ट्राच्या सत्ता बदलाची रणनिती आखली जात होती. हॉटेल रिडसनमध्ये शिंदेगटाचे आमदार थांबले होते. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येणार हे फिक्स झालं तेव्हा शिंदेगटाचे आमदार कामाख्या देवीचं दर्शन घेऊन मुंबईला परतले होते.
आता पुन्हा एकदा शिंदेगटाचे मंत्री, आमदार, खासदार आपल्या कुटुंबियांसह गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी पोहोचले आहेत.