“सावरकरांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान राहुल गांधींना कळू शकत नाहीत, कारण…”
भाजपचे खासदार सुजय विखे यांनीही राहुल गांधींवर टीका केलीय.
अहमदनगर : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या सावरकरांबाबतच्या विधानाची सध्या जोरदार चर्चा होतेय. भाजप-शिंदेगटासह अनेक हिंदुत्ववादी संघटना यावर आक्षेप घेत आहेत. भाजपचे खासदार सुजय विखे यांनीही राहुल गांधींवर टीका केलीय. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान स्वातंत्र्य लढ्यामध्ये आहे, हे राहुल गांधी ओळखू शकत नाहीत. कारण ते त्या काळात भारतामध्ये होते का नाही हाच मोठा प्रश्न आहे, असं सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) म्हणालेत.
सावरकरांचं स्वातंत्र्य लढ्यासाठी किती मोठं योगदान आहे. याची जाणीव राहुल गांधींना असणं. त्यांना सावकरांचं कार्य आणि संघर्ष समजणं गरजेचं आहे. पण ते सावरकरांचं व्यक्तीमत्व समजून घेतील अशी अपेक्षाही मला त्यांच्याकडून नाही, असं सुजय विखे पाटील म्हणालेत.
अचानक या वयात, बावन्नव्या वर्षी 66 दिवसापासून चालत आहेत. त्यामुळे त्याच्यावर परिणाम होऊ शकतो, असं म्हणत सुजय यांनी भारत जोडो यात्रेवर भाष्य केलंय.
राहुल गांधी यांचं विधान काय?
भारत जोडो यात्रेदरम्यान संबोधित करताना राहुल गांधी यांनी विनायक सावरकर यांच्यावर टीका केली. सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे. काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात जात ते इंग्रजांसोबत काम करायचे. सावरकर तुरुंगातून बाहेर आले तेव्हा खरे सावरकर सगळ्यांसमोर आले. सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिली. त्यानंतर इंग्रजांनी त्यांना सोबत काम करण्याचं आमंत्रण दिलं. सावरकरांनी इंग्रजांसमोर हात जोडले आणि मी आपल्यासोबत काम करायला तयार आहे.तुमच्या अपेक्षेप्रमाणे मी काम करेन, असं म्हणत राहुल गांधी यांनी सावरकरांच्या स्वातंत्र्य लढ्यातील भूमिकेवर टीका केलीय.