नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबईत अंमलबजावणी संचालनालयानं (इडीनं) अटक केल्यानंतर त्यांच्या अडचणींत आणखी वाढ होताना दिसतेय. आता ईडीकडून अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांना समन्स पाठविण्यात आलं. ऋषिकेश देशमुख ईडी कार्यालयात हजर राहणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान, नागपूरच्या अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी शुकशुकाट पसरलाय.
काल अनिल देशमुख यांची मेडिकल चाचणी झाली. त्यानंतर दुपारी दोन वाजता ते बाहेर आल्याची माहिती त्यांचे वकील इंदरपाल सिंह यांनी माध्यमांना दिली. देशमुख यांची चौकशी संपल्यानंतर क्लोजर स्टेटमेंट घेण्यात आलं. तिथं काय घडलं हा तपासाचा भाग असल्यानं ते उघड करू शकत नसल्याचं सिंह म्हणाले. संबंधितांना बोलावून समोरासमोर विचारणा केली जाऊ शकते. उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयात देशमुख यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळं त्यांनी इडीसमोर हजेरी लावली.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सहा नोव्हेंबरपर्यंत अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) कोठडी सुनावलीय. त्यामुळं त्यांच्या नागपुरातील सिव्हील लाईन्स येथील निवासस्थानी कुणीही घरी फक्त काम करणारे कर्मचारी होते. देशमुख यांच्या कुटुंबातील एकही सदस्य येथे उपस्थित नव्हते. राज्याचे माजी गृहमंत्री असल्यानं त्यांच्या घरासमोर पोलिसांची सुरक्षा लावण्यात आली आहे. वारंवार नोटीस बजावूनही ते न्यायालयात हजर झाले नव्हते. शेवटी काल ईडीसमोर हजर झाले. तेव्हापासून त्यांना अटक होण्याची शक्यता असल्यानं नागपुरातील निवासस्थानी कुणीही घरी दिसले नाही.
कुटुंबातील व्यक्ती नागपुरातील घरी नसल्यानं त्यांचे कुटुंबीय दिवाळीचा उत्साह साजरा करू शकणार नाहीत, असं एकंदरित चित्र आहे. ईडी कोठडीत असताना त्यांना घरचे अन्न तसेच औषध घेता येणाराय. न्यायालयात देशमुखांची बाजू मांडण्यासाठी त्यांच्या वकिलांना परवानगी देण्यात आली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप लावले होते. या प्रकरणी ही अटक करण्यात आली. मुंबईतील हॉटेल आणि बारमधून महिन्याला 100 कोटी खंडणी वसूल करण्याचे आदेश देशमुख यांनी निलंबित सहाय्यक निरीक्षक सचीन वाझे यांना दिले होते, असा आरोप सिंग यांनी केलाय.
इतर संबंधित बातम्या