सत्ता पाडण्यापेक्षा स्वत:च्या संघटनेकडे लक्ष द्या, तटकरेंचा भाजपला सल्ला

| Updated on: Feb 15, 2020 | 12:33 PM

आता आम्ही मध्यावधी निवडणुकांच्या तयारीला लागलो आहोत, या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरुन राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी ताशेरे ओढले आहेत.

सत्ता पाडण्यापेक्षा स्वत:च्या संघटनेकडे लक्ष द्या, तटकरेंचा भाजपला सल्ला
Follow us on

रत्नागिरी : आता आम्ही मध्यावधी निवडणुकांच्या (Mid-Term elections) तयारीला लागलो आहोत, या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरुन राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी ताशेरे ओढले आहेत (Sunil Tatkare criticise BJP). “अजून निवडणुकांमधली अंगावरची हळद उतरली नाही. त्या भाजपच्या आमदारांना पुन्हा निवडणुकीत काही स्वारस्य असेल, असं वाटत नाही. सत्तेपासून बाजूला गेल्याने माशाची जशी पाण्यासाठी तडफड होते, तशी भाजपची अवस्था झाली आहे”, असं म्हणत सुनील तटकरे यांनी भाजपवर निशाणा साधला (Sunil Tatkare criticise BJP).

“भाजपच्या 100 आमदारांना मध्यावधी निवडणुका हव्यात, असं वाटत नाही. महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्ष कार्यरत रहाणार आहे”, असंही सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं.

“महाविकास आघाडीतील सेना आणि राष्ट्रवादीमध्ये नक्कीच समन्वय आहे. महाविकास आघाडीला पाडण्यासाठी महाविकास आघाडीमधील कुठलाच आमदार प्रतिसाद देत नाही. त्यामुळे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी आम्ही आघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत नसल्याचं उत्तर दिलं”, असा टोला सुनील तटकरे यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.

तसेच, “भाजपने महाविकास आघाडीची सत्ता पाडणे सोडा, त्यापेक्षा भाजपची संघटना जी विस्कळीत झाली आहे, ती व्यवस्थित करण्यासाठी प्रयत्न करायला हवे”, असा खोचक सल्ला सुनील तटकरे यांनी दिला.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

“महाविकास आघाडी सरकार भाजप नेत्यांशी सूडबुद्धीने, द्वेषभावनेतून वागत आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबर पुन्हा लगेच सूर जुळणे कठीण आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजप करणार नाही, आम्हाला त्यात रस नाही. ते आपापसातील मतभेदांमुळेच पडेल. भाजप आता मध्यावधी निवडणुकांसाठी तयारी सुरु करणार आहे”, असं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.