मुंबई : दोन तृतीयांश आमदार, म्हणजे 36 आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे असतील, असे वाटत नाही. पण, एकनाथ शिंदे यांच्याकडे असणारे आमदार लक्षात घेता, आता महाविकास आघाडीही अल्पमतात आली आहे. त्यांच्याकडे आता बहुमताचा आकडा 144 नाही. त्यामुळे सरकारला सभागृहात राजीनामा द्यावा लागेल. पुन्हा काही काळ कोश्यारी आजोबांचे राज्य येईल, असे पत्रकार संजय आवटे (Sunjay Awate) म्हणाले आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी बंड केले आहे. कालपासून नॉट रिचेबल असणारे एकनाथ शिंदे सध्या सुरत-अहमदाबाद गुजराज याठिकाणी आहेत. त्यांनी काही प्रस्ताव आपल्या समर्थकांमार्फत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यापर्यंत पोहोचवले असल्याचीही चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय आवटे यांनी एक फेसबुक पोस्टद्वारे आताच्या परिस्थितीचे विश्लेषण केले आहे. एक शक्यता अशी आहे, या आशयाखाली त्यांनी पोस्ट केली आहे.
त्यांनी म्हटले आहे, की महाविकास आघाडीकडे 144 हा बहुमताचा आकडा नाही. दुसरीकडे भाजपाकडेही ‘मॅजिक फिगर’ नाही. 134 आमदार भाजपासोबत आहेत, असे दिसते. विधानपरिषद निवडणुकीने ते स्पष्ट केले. त्यामुळे 134 हाच बहुमताचा आकडा होईल, यासाठी भाजपा प्रयत्न करेल. म्हणजे विधानसभेत 267 आमदार असायला हवेत. एकनाथ शिंदे गटाचे सुमारे 20 आमदार राजीनामा देतील आणि भाजपा बहुमत सिद्ध करेल, असे दिसते. एकनाथ शिंदेंकडे 36 आमदार असतील, तर मग विषयच संपला. यात राष्ट्रवादी काँग्रेस बघ्याची भूमिका घेईल, असे गृहीत धरले आहे. प्रत्यक्षात, ‘बघताय काय, सामील व्हा!’, असाही नारा ते देऊ शकतात. पहाटेची स्वप्ने खरी ठरतात, असे उगाच म्हणत नाहीत, असे आपल्या पोस्टमध्ये संजय आवटे यांनी म्हटले आहे.
राज्यात सुरू असलेल्या या घडामोडींवर भाजपाने वेट अँड वॉच अशी प्रतिक्रिया दिली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या विषयावर आत्ताच भाष्य करणे खूप घाईचे होईल, असे म्हटले आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे अनेकजण नाराज असल्याचे त्यांनी सांगितले. सत्तेत सहभागी होण्यासाठी अनैसर्गिक युती त्यांनी केली आहे. ती खूप काळ टिकणार नाहीच. तर एकनाथ शिंदेंना अद्याप भाजपाने प्रस्ताव दिला नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.