Sanjay Raut : मातोश्रीवर याव्यात म्हणून द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा नाही, हा राजकीय निर्णयही नाही: संजय राऊत
Sanjay Raut : द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय हा काही राजकीय नाही. शिवसेनेत अनेक आदिवासी कार्यकर्ते आहेत. आदिवासी कार्यकर्त्यांचा आग्रह होता. म्हणून निर्णय घेतला. आदिवासींबद्दलच्या चांगल्या भावनेतून हा निर्णय घेतला आहे. राजकारणाच्या पलिकडे जाऊन आम्ही निर्णय घेतला.
मुंबई: भाजपप्रणित एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (draupadi murmu) या आज मुंबईत येणार आहेत. यावेळी त्या भाजपचे खासदार, आमदार आणि शिंदे गटाच्या आमदारांशी संवाद साधून त्यांना मतदान करण्याचं आवाहन करणार आहे. शिवसेनेनेही मुर्मू यांना पाठिंबा दिल्याने मुर्मू या मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांची भेट घेणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. द्रौपदी मुर्मू या शिवसेनेत याव्यात म्हणून निर्णय घेतला नाही. त्यामुळे त्यांना पाठिंबा दिला नाही. हा राजकीय निर्णय नाही. ही आमची भावना आहे. आदिवासी समाजाबाबतचा आदर आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा दिला आहे, असं राऊत म्हणाले. ते मीडियाशी संवाद साधत होते.
द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय हा काही राजकीय नाही. शिवसेनेत अनेक आदिवासी कार्यकर्ते आहेत. आदिवासी कार्यकर्त्यांचा आग्रह होता. म्हणून निर्णय घेतला. आदिवासींबद्दलच्या चांगल्या भावनेतून हा निर्णय घेतला आहे. राजकारणाच्या पलिकडे जाऊन आम्ही निर्णय घेतला. यापूर्वीही शिवसेनेने असे निर्णय घेतले आहेत. यापूर्वी प्रतिभा पाटील यांना महाराष्ट्राची कन्या म्हणून पाठिंबा दिला. प्रणव मुखर्जी यांनाही पाठिंबा दिला होता. शिवसेनेची ही परंपरा आहे. योग्य व्यक्तीला मतदान करणं हाच आमचा हेतू आहे, असं राऊत म्हणाले.
कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर
नंदूरबार, धुळे, मेळघाटमध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. आमचे अनेक आमदार आदिवासी आहेत. त्याभागातून निवडून आले आहेत. त्यांच्या भावना समजून घेऊन हा निर्णय घेतला आहे, असंही त्यांनी सांगितलं. द्रौपदी मुर्मू या मागास भागातून आल्या आहेत. त्या राष्ट्रपती व्हाव्यात ही राष्ट्राची भावना आहे. त्यामुळे निवडणुका आणि राजकीय फायद्या तोट्याचं गणित आम्ही पाहिलेलं नाही, असं त्यांनी सांगितलं.
एनडीएच्या बैठकीशी संबंध नाही
आज एनडीएची बैठक आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा होणार आहे. त्या बैठकीला तुम्ही जाणार का? असा सवाल राऊत यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी नाही असे उत्तर दिलं. आम्ही एनडीएत नाही. त्यामुळे बैठकीला जाण्याचा प्रश्नच नाही. आम्ही एनडीएत नाही. तरीही एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे, असं त्यांनी सांगितलं.