शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह कुणाचं? सुप्रीम कोर्टात आज फैसला होण्याची शक्यता, आज सुनावणी
शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्हा गोठवलं जाणार की नाही? धनुष्यबाण चिन्हावरील शिंदे गटाच्या दाव्याचं काय होणार? सुप्रीम कोर्टातील सुनावणीकडे लक्ष
संदीप राजगोळकर, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज घटनापीठासमोर (Supreme Court Hearing on Shiv sena) सुनावणी होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं या सुनावणीकडे लक्ष लागलंय. शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी होणार असून आज एक महत्त्वपूर्ण निर्णयही समोर येण्याची शक्यताय.
धनुष्यबाण (Shiv sena Party Election Sign) चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात आज फैसला होतो का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण राज्यातील जनतेला पाहता येणार आहे. 5 सदस्यीय घटनापीठासमोरील सत्तासंघर्षाची सुनावणी LIVE असणार आहे.
पाहा व्हिडीओ :
खरी शिवसेना आम्हीच आहोत, असा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आता याप्रकरणी आज नेमका काय युक्तिवाद केला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धनुष्यबाण हे आपलंच चिन्ह असल्याचा शिंदे गटाकडून दावा करण्यात आला आहे.
शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवून टाकण्याची शिंदे गटाची मागणी आहे. तर आधी आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्याची शिवसेनेनं मागणी केलीय. सुनावणी पूर्ण होईपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये, असा शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात युक्तिवाद केला होता. दरम्यान, या सगळ्या युक्तिवादानंतर आज (27 सप्टेंबर) सुप्रीम कोर्टात पुन्हा युक्तिवाद केला जाईल. त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ, असं सुप्रीम कोर्टानं मागील सुनावणीत म्हटलं होतं.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर आरोप करत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारलं होतं. त्यानंतर शिवसेनेच्या 40 आमदारही त्यांच्या बंडात सामील झाले होते. यानंतर महाविकास आघाडी सरकार संकटात आलं. अखेर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने पुन्हा सत्ता स्थापन केली. दरम्यान, शिवसेनेचं हे सरकार बेकायदेशीर असल्याचा आरोप करत सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
विधानसभेच्या उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्तावावरील याचिका, खरी शिवसेना कुणाची?, धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार?, राज्यपालांची भूमिका, अशा एकमेकांत गुंतलेल्या विषयांवरील सर्व याचिकांचा प्रश्न सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. हा राजकीय पेच सोडवण्यासाठी अखेर घटनापीठाची स्थापना करण्यात आली. या घटनापीठासमोर आज होणाऱ्या सुनावणीत नेमकं काय घडतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.