महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष! पहिल्या दीड तासाच्या सुनावणीत 3 वेळा कामकाज थांबून न्यायमूर्तींनी….
राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी मंगळवारी सकाळी सुरु झाली, पण सुनावणीदरम्यान तीन वेळा ती थांबवण्यात का आली?
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची (Shivsena vs Eknath Shinde) सुनावणी मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता सुप्रीम कोर्टात (supreme court pleas) सुरु झाली. पहिल्या दीड तासांत झालेल्या सुनावणीवेळी शिवसेनेच्या वतीने कपिल सिब्बल आणि अभिषेक मनुसिंघवी यांच्या वतीने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. धनुष्यबाण या शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात घटनापीठ (constitutional bench decision) काय निर्णय घेणार, याबाबत आज काय निर्णय येतो, हे पाहणं महत्त्वाचंय. पण विशेष म्हणजे कपिल सिब्बल आणि अभिषेक मनुसिंघवी या दोघांच्याही युक्तिवादावेळी न्यायमूर्तींनी तीन वेळा सुनावणी थांबवली आणि एकमेकांशी चर्चा केली.
घटनापीठातील पाच न्यायमूर्तींसमोर आज सकाळी सुनावणी सुरु झाली. या सुनावणीची सुरुवात कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने करण्यात आली. या युक्तिवादावेळी शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाच्या निर्णयाआधी बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आधी घ्यावा, असा युक्तिवाद करण्यात आला.
शिवसेनेच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादावेळी परिशिष्ट 10 आणि घटनात्मक पेचाबाबतही उल्लेख करण्यात आला. यावेळी राजकीय पक्ष, विधीमंडळ पक्ष, यांच्या व्याख्या यावर जोरदार युक्तिवाद करण्यात आला. निवडणूक आयोगाचा मुद्दा आणि आमदारांच्या अपात्रतेचा विषय एकमेकांशी संबंधित कास आहे, यावरुनही युक्तिवाद रंगला.
अनेक संज्ञा, आणि गुंतागुंतीचा विषय असल्याने न्यायमूर्तींनी हे सगळं प्रकरण आणि युक्तिवाद ऐकून घेताना दोनवेळी कपिल सिब्बल यांना थांबवलं आणि एकमेकांशी चर्चा केली. त्यानंतर पुन्हा सुनावणीला सुरुवात झाली.
दरम्यान, तासाभराच्या युक्तिवादानंतर अभिषेक मनुसिंघवी यांच्यावतीने युक्तिवादाला सुरुवात करण्यात आली. या युक्तिवादावेळीही न्यायमूर्तींनी सुनावणी थांबवून चर्चा केली. दरम्यान, सादीक अली प्रकरणाचा दाखल दिल्यानंतर न्यायमूर्तींनी अभिषेक मनुसिंघवी यांना थांबवलं आणि 10 मिनिटांचा तांत्रिक ब्रेक घेत असल्याचं सांगितलं. पण त्याआधीही एकदा अपात्रतेचा मुद्दा आणि निवडणूक चिन्हा यावरुन युक्तिवाद झाला. तेव्हाही सिंघवी यांना थांबवण्यात आलं होतं.
यावेळी अपात्रतेचा मुद्दा विधीमंडळाचा आहे, असंही घटनापीठाने यावेळी स्पष्ट केलं. शिवाय कोणती खरी शिवसेना याचा निर्णय निवडणूक आयोग घेऊ शकतं का, असा प्रश्नही घटनापीठाने उपस्थित केला. साधारण दीड तासांच्या सुनावणीच्या सुरुवातीच्या सत्रात तीन वेळा सुनावणी थांबवून न्यायमूर्तींनी चर्चा केली. तर चौथ्यावेळी थेट 10 मिनिटांचा तांत्रिक ब्रेक घेण्यात आला. आजच्या या सुनावणीत नेमकं काय घडतं, याकडे आता महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय.