नवी दिल्ली: आपल्या आक्षेपार्ह वक्तव्यांनी मध्य प्रदेश निवडणुकीत चर्चेत आलेले काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना सर्वोच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. नोटीस बजावूनही कमलनाथ यांची निवडणूक प्रचारादरम्यान सुरु असलेली आक्षेपार्ह वक्तव्य थांबली नाहीत, असं सांगत निवडणूक आयोगाकडून त्यांना काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळण्यात आलं होतं. निवडणूक आयोगाच्या या आदेशाविरोधात कमलनाथ यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाचा आदेश रद्द ठरवला आहे. (Supreme Court relief to Kamal Nath will remain on the list of star campaigners of the Congress)
सर्वोच्च न्यायालयात सोमवारी झालेल्या सुनावणी दरम्यान, सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती वी. रामासुब्रमण्यम यांच्या खंडपीठानं निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द ठरवला आहे. त्यामुळे कमलनाथ हे काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत राहणार आहेत. निवडणूक आयोगाने आपल्या वैधानिक अधिकारांचं उल्लंघन केल्याचं कमलनाथ यांनी आपल्या याचिकेत म्हटलं होतं. निवडणूक आयोगाला एखाद्या पक्षाच्या स्टार प्रचारकाचा दर्जा काढून घेण्याचा अधिकार आहे का? असा सवाल सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी विचारला.
आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना मोठा झटका दिला होता. निवडणूक आयोगाने कमलनाथ यांचं स्टार प्रचारकांच्या यादीतील नाव हटवलं होतं. त्यामुळे कमलनाथ मध्यप्रदेशातील पोटनिवडणुकीत प्रचार करू शकणार असले तरी त्यांच्या प्रचाराचा खर्च पक्षाला नाही तर उमेदवाराला द्यावा लागणार होता.
कमलनाथ यांच्याकडून आचारसंहितेचं उल्लंघन होत असल्याच्या वारंवार तक्रारी येत होत्या, त्यामुळे त्यांचं स्टार कँम्पेनरपद काढून घेण्यात आल्याचं आयोगानं म्हटलं होतं. कमलनाथ यांनी आपल्या भाषणात भाजप उमेदवार इमरती देवी यांना आयटम संबोधले होते. तसेच शिवराज सिंह चौहान यांना नौटंकी कलाकार म्हटलं होतं. त्यामुळं निवडणूक आयोगाने कमलनाथ यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला होता.
‘त्या’ वक्तव्यावरुन राहुल गांधींनी कमलनाथांना जाहीरपणे फटकारले, म्हणाले…
Supreme Court relief to Kamal Nath will remain on the list of star campaigners of the Congress