डासांचा उच्छाद भोवला, डेंग्यू झाल्याने सुप्रिया सुळेंना ऐन निवडणूक काळात बेड रेस्ट
राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना डेंग्यूची लागण (Supriya Sule down with Dengue) झाली आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) तारखांच्या घोषणेनंतर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला (Election Campaign) सुरुवात केली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसही (NCP) आघाडीवर आहे. मात्र, याच काळात राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना डेंग्यूची लागण (Supriya Sule down with Dengue) झाली आहे. स्वतः सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबूक पेजवर याबाबत माहिती दिली. प्रचारात सर्वांसोबत खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी सज्ज असताना डेंग्यूची लागण झाल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “ऐन प्रचाराच्या धामधुमीत सर्वांसोबत खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी मी सज्ज आहे. परंतु डासांचा उच्छाद अखेर भोवला! मला डेंग्यूची लागण झाली असून डॉक्टरांनी विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे.”
दरम्यान, सुप्रिया सुळे (Supriya Sule) राष्ट्रवादीच्या आघाडीच्या नेत्या आहेत. महिला संघटनासोबतच राज्यात अनेक विषयांवर त्यांनी नेतृत्व केलं आहे. अगदी अलिकडचा मुंबई मेट्रो कारशेडच्या विषयातही त्यांनी ठोस भूमिका घेतली. त्या स्वतः ‘आरे’मधील वृक्षतोडीबाबत (Aarey Metro Car shed) माहिती घेण्यासाठी गेल्या होत्या.
जालन्यातील निर्भयावर मुंबईत झालेल्या बलात्काराच्या (Mumbai Gang rape) प्रकरणावरही सुप्रिया सुळेंनी आक्रमक पवित्रा घेतला होता. तसेच राज्यातील महिला अत्याचाराच्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) घेरलं होतं. मुख्यमंत्री फडणवीस महाजनादेश यात्रेत (MahaJanadesh Yatra) गुंग आहेत. त्यांनी जालन्यात असून या बलात्कार पीडितेविषयी एक शब्दही काढला नाही, अशी घणाघाती टीका त्यावेळी सुप्रिया सुळेंनी केली होती.