Supriya Sule : पुण्याच्या रस्त्यांवरील खड्डे 7 दिवसात भरा, नाहीतर आंदोलन, खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा; शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र
पुणे शहरातील रस्त्यावपरील कामासंदर्भात महापालिकेने श्वेतपत्रिका काढावी ही राष्ट्रवादीची मागणी आहे, असं सुळे म्हणाल्या. विजेचा दर वाढवला आहे, तर सर्व्हिस तरी चांगली द्या असा टोलाही त्यांनी सरकारला लगावलाय.
पुणे : जोरदार पावसामुळे पुण्यातील बहुतांश भागात रस्त्यांवर मोठाले खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. या पार्श्वभूमीवर आणि 23 गावांच्या पाणी प्रश्नासंदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुणे महापालिका आयुक्तांची (Municipal Commissioner) भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन सुळे यांनी महापालिकेला इशारा दिलाय. शहरातील रस्त्यावरील खड्डे 7 दिवसाच्या आत भरुन काढावेत. अन्यथा आंदोलन (Agitation) करणार. पुणे शहरातील रस्त्यावपरील कामासंदर्भात महापालिकेने श्वेतपत्रिका काढावी ही राष्ट्रवादीची मागणी आहे, असं सुळे म्हणाल्या. विजेचा दर वाढवला आहे, तर सर्व्हिस तरी चांगली द्या असा टोलाही त्यांनी सरकारला लगावलाय.
‘रस्त्यांवरील कामासंदर्भात महापालिकेनं श्वेतपत्रिका काढावी’
सुप्रिया सुळे यांनी आज पुणे महापालिका आयुक्तांची भेट घेतली. त्यावेळी कचरा आणि मेट्रोच्या प्रश्नावर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. पुणे शहरातील रस्त्यांवरील कामासंदर्भात महापालिकेनं श्वेतपत्रिका काढावी अशी राष्ट्रवादीची मागणी आहे, असंही सुळे म्हणाल्या. त्यांनी शिंदे आणि फडणवीसांवरही निशाणा साधला. पुणे शहरातील एवढ्या घाई घाईत सरकार पाडलं, ना अता ना पता, मंत्री नाहीत, कुणाचं काय चाललंय हेच कळत नाही. स्वत:च्या इगोसाठी निर्णय रद्द करणं चुकीचं आहे. मागच्या सरकारमध्ये त्यांचेच लोक होते, अशी प्रतिक्रियाही सुळे यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर दिलीय.
‘मला मुख्यमंत्र्यांची काळजी वाटते’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिठ्ठी लिहून दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही यावर टिप्पणी केली होती. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनीही देवेंद्र फडणवीसांना टोला लगावलाय. मुख्यमंत्री हे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक असतात. मात्र, त्यांचा अपमान करण्याचं काम केलं जात आहे. हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे राज्यातील जनतेचा अपमान असतो. मुख्यमंत्र्यांच्या मागे काहीतरी मोठं षडयंत्र केलं जात आहे’, असा आरोप सुळे यांनी केलाय.