उर्फी जावेदच्या कपड्यांवरून चित्रा वाघ-चाकणकरांमध्ये वाद, सुप्रिया सुळेंची भूमिका काय?

| Updated on: Jan 08, 2023 | 11:09 AM

Urfi Javed : उर्फी जावेद हिच्या कपड्यांचा मुद्दा मागच्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आलाय. त्यावर सुप्रिया सुळे यांनी आपलं मतं मांडलंय...

उर्फी जावेदच्या कपड्यांवरून चित्रा वाघ-चाकणकरांमध्ये वाद, सुप्रिया सुळेंची भूमिका काय?
Follow us on

पुणे : उर्फी जावेद (Urfi Javed) हिच्या कपड्यांचा मुद्दा मागच्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आलाय. उर्फीच्या कपड्यांवरून महाराष्ट्राचं राजकारण तापलंय. तिच्या या स्टाईलवर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आक्षेप घेतला आहे. यावरून चित्रा वाघ आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर आमनेसामने आल्या आहेत. या सगळ्या प्रकरणावर राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या पुण्यात बोलत होत्या.

सुप्रिया सुळे यांनी चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यातील वादावर भाष्य केलंय. चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यातील वादाबाबत मला काही माहिती नाही. मी अधिक वाचलेलं काही नाही. पण याबाबत वाचून, अभ्यास करून नक्की बोलेन. आज देशासमोर याच्या पेक्षाही मोठे प्रश्न आहेत त्याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत, असं सुप्रिया म्हणाल्या आहेत.

अजित पवार यांची प्रतिक्रिया

अजित पवार यांनी उर्फी जावेद हिच्या कपड्यांवरून रंगलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.उर्फीच्या कपड्यांवरून महिला-महिलांमध्येच वाद सुरु आहे. या सगळ्या प्रकरणात आम्ही कुणी बोललोय का? आम्ही त्यात भाग घेतलाय का? आम्ही तर उलट महिलांना संधी देतोय. पण संधी दिल्यानंतर त्या संधीचं सोनं करायचं का राख करायची हे त्यांच्या हातात आहे, असं अजित पवार म्हणालेत.

पुणे जिल्ह्यातील सिंहगड किल्ल्यावर राष्ट्रवादीकडून स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. आपला सिंहगड आपला अभिमान म्हणत राष्ट्रवादीकडून सिंहगड किल्ल्याची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सिंहगड स्वच्छता अभियानाला खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. खासदार सुप्रिया सुळे यांनी सिंहगड किल्ल्यावर स्वच्छता केली. यावेळी बोलतांना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

शिवप्रेमी आणि इतिहास प्रेमी म्हणून मी सिंहगडावर सारखीच येत असते. गड किल्ल्यांवर कचरा पाहून वाईट वाटतं. गड किल्ले म्हणजे आपली पवित्र वास्तू आणि त्यावरती कचरा होणं दुर्दैवी आहे. ऐतिहासिक ठिकाणी स्वच्छ राहावी हाच माझा प्रयत्न आहे. अजितदादा पुण्याचे पालकमंत्री असताना सिंहगडासाठी जो काही निधी त्यांनी दिला तेवढा निधी फक्त सिंहगडाला द्या, एवढीच मागणी ED सरकारकडे करत आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्यात.