Supriya Sule : जेव्हा टीव्ही बघते तेव्हा मुख्यमंत्री कुणाच्या तरी घरीच दिसतात, दौरेही एक किलोमीटरच्या आतच; सुप्रिया सुळेंचा थेट हल्ला
Supriya Sule : राम शिंदे बारामती पाहणी करण्यासाठी आले आहेत. त्यांचं मनापासून स्वागत करते. बारामती पाहण्यासारखी आहे. नरेंद्र भाई मोदी, अमित शहा आणि महत्त्वाचे नेते सगळे बारामतीत आले आहेत.
पुणे: राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला चढवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्या घरगुती दौऱ्यांवर त्यांनी जोरदार टीका केली आहे. साम, दाम, दंड भेद सर्व काही ओक्के करून हे सरकार ओरबाडून आणलं गेलंय. त्यांचा उत्साह फक्त लाल दिव्यांचाच होतात. अडीच महिन्यात काही काम होताना दिसत नाहीत. ज्या उत्साहाने आमचं सरकार (government) पाडलं त्या उत्साहाने कामे होत नाहीत, अशी टीका करतानाच गाठीभेटी आणि होम व्हिजिट सोडून या सरकारच्या फारश्या काही बातम्या दिसत नाहीत. जे दौरे दिसतात ते एक किलोमीटरच्या आतले असतात. मी जेव्हा जेव्हा टीव्ही बघते तेव्हा मला ते कुणाच्या तरी घरीच दिसतात, असा चिमटा सुप्रिया सुळे यांनी काढला आहे.
सुप्रिया सुळे या पुण्यात आल्या होत्या. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली. राज्यात कुठेही पालकमंत्री नाहीत. कोव्हिड असो किंवा नसो अजित पवार सकाळी 6 वाजल्यपासून काम करत असायचे. त्यांच्यासोबत सर्व प्रशासन काम करत होते. दर शुक्रवारी त्यांच्या मॅरेथॉन मिटिंग व्हायच्या. आता पालकमंत्रीच नाहीत. त्यामुळे कामेही होताना दिसत नाहीत, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.
मंत्री कुणाच्याही घरी जातात
गेल्या काही दिवसांपासून मी मंत्र्यांची वेळ मागत आहे. पण वेळ मिळत नाही. त्यांना सर्वसामान्य लोकांची सेवा करायची नसेल. मंत्री फक्त कुणाच्या तरी घरी दिसत आहेत. फक्त गाठीभेटी होत आहेत. एक किलोमीटरच्या आतचा दौरा करत आहेत. हे नवलच आहे. राज्याला मागच्या अडीच महिन्यापासून पालकमंत्री नाही. त्यामुळे लोकांना कुठे तक्रार करावी हेच कळत नाही, असं त्या म्हणाल्या.
राज ठाकरेंना टोला
भाजपला कुठलीही दडपशाही नाही. त्यांच्यात कोणी कुणाला भेटू शकतो, असा टोला त्यांनी लगावला. राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या.
राम शिंदेंचं बारामतीत स्वागत
यावेळी भाजप नेते राम शिंदे यांनाही प्रत्युत्तर दिलं. राम शिंदे बारामती पाहणी करण्यासाठी आले आहेत. त्यांचं मनापासून स्वागत करते. बारामती पाहण्यासारखी आहे. नरेंद्र भाई मोदी, अमित शहा आणि महत्त्वाचे नेते सगळे बारामतीत आले आहेत. मी लोकप्रतिनिधी म्हणून स्वागत करेन. त्यांना कोणती संस्था पाहायची असेल तर मी त्यांना स्वत: घेऊन जाईल, असा चिमटाही त्यांनी काढला.