मुंबई : अजित पवार यांना राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हायचं आहे. ही त्यांची महत्वकांक्षा लपून राहिलेली नाही. खुद्द अजित पवार यांनीही ही महत्वकांक्षा भरभरसभेत बोलून दाखवली. तसंच अजित पवार यांच्या गटातील आमदार, नेते, कार्यकर्तेदेखील याबाबत उघडपणे बोलत आहेत. अशातच आता पुन्हा एकदा अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत, अशी भावना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते सुरज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की अजित दादा मुख्यमंत्री व्हावं. मुख्यमंत्री होण्यासाठी 144 आमदारांचा आकडा लागतो. इतकी राजकीय समज आम्हाला आहे. त्यासाठी जास्तीत जास्त आमदार आम्ही निवडून आणू आणि अजितदादांना राज्याचा मुख्यमंत्री नक्की करू, असं सुरज चव्हाण म्हणालेत.
शरद पवार सैतान आहेत. जैसे करणी,वैसी भरणी! या सैतानाला त्यांचं पाप फेडावंच लागणार आहे. पवारांच्या वरती काळाने मोठा सूड उगवला आहे हा सैतान पुन्हा गावगाड्यात येऊ नये आणि पुन्हा नवे सरदार बनवू नये. यासाठी लढाई लढावी लागेल. शरद पवारांच्या कालखंडांत सरंजामशाही होती. 50 वर्ष महाराष्ट्रात अंमल होता, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केली होती. त्याला सूरज चव्हाण यांनी उत्तर दिलं आहे.
सदाभाऊंनी आपल्या जिभेवरती ताबा ठेवावा. कारण पवार सहेबांपासुन आम्ही बाजूला जरी असलो तरी आजही ते आमचे दैवत आहेत. त्यांच्यावर केलेली टिका आम्ही खपवून घेणार नाही. पवारसाहेबांवर बोलण्याची हिमंत सदाभाऊंनी करु नये. त्यांनी आपली उंची पाहून वक्तव्य करावीत, असं सूरज चव्हाण म्हणालेत.
मुंडे यांच्या पक्षप्रवेशाबाबत स्वत: मुंडे साहेब बोलतील. कारण पक्षात प्रवेश करताना नेत्यांची राजकीय समज तितकी परिपक्व असते. त्यांनी भविष्याचा विचार करुन राष्ट्रवादी मध्ये येण्याचा निर्णय घेतला. पक्षप्रवेश कुणाच्या हाताने झाला हा महत्वाचं आहे. जुना विषय आव्हाड साहेबांनी उकरून काढू नये, असं ते म्हणालेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता आणि आधी देखील कुठल्याही चौकशीला सामोरे गेलेला आहे. ज्या एजन्सी आहेत त्या चौकशी करत आहेत आम्ही त्यांना सहकार्य करत आहोत. आम्ही भाजपासोबत जरी आलेलो असलो तरी आम्ही सर्व चौकश्याना सामोरे गेलेलो आहोत. आजपर्यंत कुठलीही चौकशी एजन्सी आमच्या एकाही नेत्यावर आरोप सिद्ध करू शकली नाही. आमचे नेते यापुढे देखील चौकशीला सहकार्य करतील, असं म्हणत चव्हाण यांनी संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.