सर्जिकल स्ट्राईक फायद्यासाठी नाही, देशाच्या सुरक्षेसाठी, सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा
बारामती : सर्जिकल स्ट्राईक हे फायद्यासाठी नसतं.. तर देशातल्या जनतेच्या सुरक्षिततेसाठी असतं.. आपण कोणीही तिकडे लढायला जात नाही.. त्यामुळं दुसर्यांच्या कामाचं श्रेय घेऊन आयत्या बिळावर नागोबा होणं योग्य वाटत नाही असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावलाय. सर्जिकल स्ट्राईकचं खरं श्रेय सैनिकांना जातं. त्यांच्या योगदानामुळे आपण मोकळा श्वास घेतोय.. मात्र काहीजण यावर राजकीय पोळी भाजतात […]
बारामती : सर्जिकल स्ट्राईक हे फायद्यासाठी नसतं.. तर देशातल्या जनतेच्या सुरक्षिततेसाठी असतं.. आपण कोणीही तिकडे लढायला जात नाही.. त्यामुळं दुसर्यांच्या कामाचं श्रेय घेऊन आयत्या बिळावर नागोबा होणं योग्य वाटत नाही असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावलाय. सर्जिकल स्ट्राईकचं खरं श्रेय सैनिकांना जातं. त्यांच्या योगदानामुळे आपण मोकळा श्वास घेतोय.. मात्र काहीजण यावर राजकीय पोळी भाजतात हे दुर्दैव असल्याचंही त्यांनी म्हटलंय. सेल्फी काढणं काहीच चुकीचं नाही. पण खड्ड्यांसोबत सेल्फी काढला तर सत्ताधाऱ्यांना खटकतं. सरकारनेच खड्डा दाखवण्याचं आवाहन केलं होतं. आपण सेल्फी काढले यात गैर काय, असा सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
बारामती तालुक्यात वेगवेगळ्या गावांमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दौरा करत मतदारांच्या भेटी घेतल्या. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध मुद्यांवरुन भाजप सरकारला टोले लगावले. सर्जिकल स्ट्राईकच्या श्रेयावरुन होणार्या राजकारणावर त्यांनी सरकार आयत्या बिळावर नागोबा झाल्याचा टोला लगावला.
सेल्फीवरुन होणार्या टीकेबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी सेल्फी काढण्यात गैर काय असा सवाल उपस्थित केला. आजच्या तरुणाईत सेल्फीची फॅशन वाढली आहे. त्यामुळे आपल्यासह विरोधकही सेल्फी काढत असतात. मात्र आपण जेव्हा खड्ड्यांसोबत सेल्फी काढतो ते सत्ताधार्यांना खटकत असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवतारेंनी दिलेल्या विकासकामांसोबत सेल्फी काढण्याच्या आव्हानावरही त्यांनी आपली कामे लोकांसमोर असल्याचं म्हटलंय. आपण प्रसिद्ध केलेल्या अहवालात विकासकामांचे अनेक फोटो त्यांना पाहायला मिळतील, असा टोलाही त्यांनी लगावला.
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कालच्या सॅटेलाईट चाचणीवरुन पाडलेलं सॅटेलाईट चीन किंवा पाकिस्तानचं असेल असा जावईशोध लावला होता. यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी हे दुर्दैव असल्याचं म्हटलंय. ज्यांना विषयाचा संवेदनशीलपणा समजतच नाही, असे अनेक मंत्री या सरकारमध्ये आहेत. पंतप्रधान काय बोलतात आणि त्यांचे सहकारी काय बोलतात यात प्रचंड तफावत आहे. विषयाचा अभ्यास नसताना बोलणं हे हास्यास्पद आहे. त्यामुळे ही बाब चिंताजनक असल्याचंही त्यांनी नमूद केलं. तिहेरी तलाक विधेयकाबाबत आपण संसदेत काय बोललो हे न पाहताच शिक्षणमंत्री विनोद तावडे हे जबाबदारपणे वक्तव्य करतील असं आपल्याला वाटलं नव्हतं, अशा शब्दात त्यांनी विनोद तावडेंच्या टीकेला उत्तर दिलं. त्याचवेळी तिहेरी तलाकबाबत त्यांनी आपली भूमिकाही स्पष्ट केली.
बीडमध्ये झालेल्या घटनांमध्ये गृहखात्याने जातीने लक्ष घालणं गरजेचं आहे. मात्र सध्या गृह मंत्रालय निष्क्रिय झालंय हे दुर्दैवी आहे. या पदावर अनेक मान्यवरांनी काम केलंय. असं असताना न्यायालयाने गृह मंत्रालयावर ताशेरे ओढलेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांमुळे राज्यातलं पोलीस खातं बदनाम होतंय ही दुर्दैवी बाब असल्याचंही त्यांनी सांगितलं.