3 महिन्यांचं बाळ, 500 पोलीस, 40 पैशांनी मेसेज करणारे ट्रोलर्स, पानीवाले बाबा… सुषमा अंधारेंचा निशाणा कुठे?
मोदीजींची मिमिक्री केली म्हणून राज ठाकरे साहेबांवर तुम्ही गुन्हे दाखल केला का, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केलाय.
मुंबईः तीन महिन्यांच्या बाळाला अडवण्यासाठी 500 पोलीस का लागले, असा सवाल शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील मुक्ताई नगर येथे सुषमा अंधारे यांना भाषण करण्याची परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी ही शिंदे सरकार आणि विशेषतः जळगावमधील पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दात टीका केली आहे.
तीन महिन्यांच्या बाळाला अडवण्यासाठी (सुषमा अंधारे यांचा तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेत प्रवेश झालाय) 500 पोलीस लागतात का? मुक्ताईनगरमध्ये मला थांबवणं हा गुलाबराव पाटलांचा ट्रॅप होता, असा सणसणीत आरोप त्यांनी केलाय.
त्या म्हणाल्या, 3 महिन्यांच्या बाळासाठी तुम्हाला 500 पोलिसांचा गराडा घालण्याची काय गरज होती? 3 महिन्यांच्या बाळासाठी अख्खी यंत्रणा लावायची काय गरज होती.. 40 पैशांच्या हिशोबाने मेसेज पाठवणारे ट्रोलर्स एवढी यंत्रणा का कामाला लावता?…
पाहा सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
धरणगाव मतदारसंघाचे पानीवाले बाबा, ऊर्फ छंदीफंदी शायर, उर्फ मिंधे गटातले बंडखोर आमदार, ऊर्फ जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या पायाखालची जमीन घसरली आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.
तुम्ही मोदीजींची मिमिक्री केली म्हणून माझ्यावर गुन्हे दाखल करताय. मनसे नेते राज ठाकरे यांच्याप्रमाणे तर मी निश्चितच चांगली आर्टिस्ट नाही. राज ठाकरे साहेबांवर तुम्ही गुन्हे दाखल केला का, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केलाय.