“2012 ला बाळासाहेबांचं निधन, केसरकर 2014 ला शिवसेनेत आले, मग हिंदुत्व कधी शिकले?”
सुषमा अंधारे यांनी शिंदेगटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांना एक सवाल केलाय...
कोल्हापूर : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदेगटाचे नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यावर टीका केली आहे. दीपक केसरकर फार गोड बोलतात. ते माझे भाऊ आहेत. पण त्यांना मला एक प्रश्न विचारायचाय. बाळासाहेब ठाकरे यांचं 2012 साली निधन झालं. त्यानंतर दोन वर्षांनी दीपक केसरकर 2014 ला शिवसेनेत आले. केसरकर सातत्याने बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर भाष्य करतात. पण मग ते हे हिंदुत्व शिकले कधी?, असा सवाल सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी विचारला आहे.
शिंदेगटाने बंड केल्यानंतर दीपक केसरकर यांनी शिंदेगटाची भूमिका सर्वांसमोर मांडली. यावेळी बोलताना आम्ही हिंदुत्वासाठी भाजपसोबत आलोय, असं म्हणायचे. बाळासाहेबांच्या विचारांचा दाखला द्यायचे. त्यावरून सुषमा अंधारे यांनी त्यांना सवाल केलाय.
उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी बसवायचं आहे. यासाठी महाप्रबोधन यात्रा सुरू आहे, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी शिवसैनिकांना पुन्हा नव्याने कामाला लागण्याचं आवाहन केलंय.
गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे या राष्ट्रवादीतून आल्या आहेत, असं विधान केलं होतं. त्यावरही अंधारे यांनी भाष्य केलंय. मी कधीही राष्ट्रवादीची सदस्य नव्हते. तरीही गुलाबराव पाटील म्हणतात की, मी राष्ट्रवादीतून आले!, असं अंधारे म्हणाल्या आहेत.
गुलाबराव पाटील यांना आवरा! महिलांवर कमरेखालचे वार केले जात आहेत. शिंदेगटाचे नेते कौटुंबिक पातळीवर जा टीका करत आहेत. मुख्यमंत्री साहेब यांना आवारा, असं अंधारे म्हणाल्या आहेत.
भाजप कपटी आणि कारस्थानं करणारा पक्ष आहे. शिंदे गट माझा भाऊच आहे. शिंदे गटात गेलेल्या लोकांना आता पश्चाताप होतोय. शिंदेगटची भाजपच्या राजकारणाने त्रासला आहे, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.