भाजप कपटी!, शिंदेगटातील माझ्या भावांना आता पश्चाताप होतोय- सुषमा अंधारे
सुषमा अंधारे यांनी भाजपवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवलाय...
कोल्हापूर : शिवसेना ठाकरेगटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवलाय. भाजप कपटी असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर शिंदे गटातील लोक नाराज असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. भाजप (BJP) कपटी आणि कारस्थानं करणारा पक्ष आहे. शिंदे गट माझा भाऊच आहे. शिंदे गटात गेलेल्या लोकांना आता पश्चाताप होतोय. शिंदेगटची भाजपच्या राजकारणाने त्रासला आहे, असं सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबडेकर यांची 20 तारखेला भेट होणार होती. पण वंचित आघाडीकडून अजून तसा प्रस्ताव आलेला नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
आमचे 40 आमदार गेले असले तरी पुन्हा चाळीस आमदार निवडून आणणार! एवढंच नाहीतर म्हणाले तसं 103 दिवस जेलमध्ये राहिलो त्यामुळे 103 आमदार निवडून आणणार, असा निर्धार संजय राऊत यांनी केला आहे. तो पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
फडणवीसांना सवाल
जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा व्हीडिओ समोर आलाय. त्यात कुठेही विनयभंग झाल्याचं दिसत नाही. असं असताना आव्हाडांवर गुन्हा दाखल होतोय. हे सारं सूडबुद्धीने सुरु आहे. या सगळ्याबद्दल मला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक प्रश्न विचारायचाय. कृषीमंत्री अब्दुल सतार आणि पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर तुम्ही कारवाई कधी करणार? त्यांनी महिलांबाबत केलेली विधानं सर्वांना माहित आहेत. त्यांच्यावर कारवाई कधी करणार?, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी आव्हाडांवरील दाखल गुन्ह्याप्रकरणी फडवणीस यांना प्रश्न विचारला आहे.