मुंबईः नोटांवर फोटोच छापायचे असतील तर ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिला. अर्थक्रांतीचा सखोल अभ्यास केला, त्यांचा फोटो हवा, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी दिली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भारतीय चलनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचे (Laxmi and Ganesh) फोटो छापण्याची मागणी केली आहे.
हिंदुविरोधी नेता अशी प्रतिमा असलेल्या केजरीवालांनी ही मागणी केल्यानंतर राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जातंय. पण विविध राज्यांमधून यावर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. महाराष्ट्रात शिवसेनेत नव्याने आलेल्या सुषमा अंधारे यांनी यावर मत व्यक्त केलंय.
सुषमा अंधारे टीव्ही9 शी बोलताना म्हणाल्या, ‘ ही मांडणी धार्मिक अंगाने घेऊ नये. चलनी नोटांवर नावंच टाकायची असतील तर ज्यांनी प्रॉब्लेम ऑफ रुपीज सारखा ग्रंथ लिहिला. नोटबंदीसारखा निर्णय आत्ता घेतला, पण ज्यांनी याची मांडणी अनेक वर्षांपूर्वी केली.
ज्यांच्या थेसिसमुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केली. या सर्व अर्थक्रांतीचा अभ्यास केला, त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो चलनी नोटांवर असणं हे मला जास्त योग्य वाटतं, असं मला वाटतं. किंबहुना ते जास्त समर्पक होईल.
याआधीही अनेक राजकीय नेते होऊन गेले, ज्यांनी चलनी नोटांवर डॉ. आंबेडकर, स्वामी विवेकानंद, यांचे फोटो असावेत, असे म्हटले जातात. देशाचे वैचारिक अधिष्ठान जे घडवतात, त्याचे ऐतिहासिक संदर्भ असणाऱ्या व्यक्तींचे फोटो चलनी नोटांवर येतात. त्यामुळे फोटोच घ्यायचे असतील तर ज्यांनी एकूण अर्थक्रांतीचा अभ्यास केलाय. त्यांचे फोटो हवेत, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
गांधीजींसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचाही फोटो हवा. पण यावरून वादंगही होऊ नये. अरविंद केजरीवाल यांनी लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो नोटांवर हवा, ही मागणी करणं, यात त्यांना या देवतांमध्ये फार स्वारस्य आहे, असे मला वाटत नाही. पण फक्त चर्चेची राळ उठवून देण्यासाठी हे केल्याचं दिसून येतंय, असा संशय सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला.
बेरोजगार, सुरक्षा, महिला, आदी प्रश्न सोडून लोकांना रवंथ करण्यासाठी हा विषय दिल्याचं वाटतंय. असेही काही मनसुबे असू शकतात. सध्या भारत आणि महाराष्ट्रसुद्धा सुजाण होत चाललाय. त्यामुळे जनता अशा विषयांकडे किती गांभीर्याने बघतील, हेही पहावं लागेल, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली.