मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार का?; सुषमा अंधारे म्हणाल्या, हा तर भाजपचा…
राणे पिता पुत्रांबद्दल मला फार गांभीर्याने काहीच मांडावं असं वाटत नाही. राणे यांनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांना मैदानात येता येणार नाही. त्यांना पव्हेलियनमध्येच बसून राहावे लागेल.
पुणे: मिलिंद नार्वेकर (milind narvekar) ठाकरे गटात नाराज असल्याचं मी सुद्धा ऐकतो आहे, असं विधान भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन (girish mahajan) यांनी केलं आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे मिलिंद नार्वेकर शिवसेना सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या सर्व चर्चांचा ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (sushma andhare) यांनी समाचार घेतला आहे. मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार हा भाजपने सोडलेला फुसका बार आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.
सुषमा अंधारे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा पलटवार केला आहे. दिवाळी असल्याने काही लवंगी मिरच्या तडतड करत आहेत. काही छोट्या छोट्या फुलबाज्या सुध्दा आपली चमक दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काही फुसके बार देखील होत आहेत. मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार हा तोच फुसका बार आहे. जो भाजपने सोडला आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
भाजपकडून मिलिंद नार्वेकर यांच्या नावाने सातत्याने फुसका बार सोडला जात आहे. पण भाजपचा हा फुसका बार काही केल्या वाजत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
यावेळी त्यांनी केंद्रीय नारायण राणे यांच्यावरही टीका केली. राणे पिता पुत्रांबद्दल मला फार गांभीर्याने काहीच मांडावं असं वाटत नाही. राणे यांनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांना मैदानात येता येणार नाही. त्यांना पव्हेलियनमध्येच बसून राहावे लागेल. कोण ठाकरे? असं विचारता पण त्याच ठाकरेंनी तुमची कुवत नसताना सुद्धा तुम्हाला एवढ्या मोठा पदावर बसवलं. याच ठाकरेंमुळे आणि याच मातोश्रीमुळे तुम्ही इथपर्यंत पोहोचला. नाहीतर ठाकरे नसते तर नारायण राणे कणकवली लिमिटेड कंपनी इतकचं मर्यादित असते, असा हल्लाही त्यांनी चढवला.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आज वाढदिवस आहे. मिलिंद नार्वेकर यांनी अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातच मंत्री गिरीश महाजन यांनी मिलिंद नार्वेकर हे नाराज असल्याचं मीही ऐकून आहे. शिवसेनेतून कोण कधी बाहेर पडेल सांगता येत नाही, असं सूचक विधान केलं. त्यामुळे मिलिंद नार्वेकर हे ठाकरे गटात नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.