देवेंद्र फडणवीस यांच्या मनात छत्रपती शिवराय आणि डॉ. आंबेडकरांबद्दल आकस, नाही तर ते… सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
भाजपचं शिवरायांवरचं प्रेम बेगडी आहे. त्यांना महापुरुषांपेक्षा खुर्ची महत्त्वाची वाटत असेल तर त्यांच्या खुर्च्या हिसकावल्या पाहिजेत, असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलं.
पुणेः भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल प्रचंड आकस आहे. त्यांच्याच अधिपत्याखाली एका-एका राजकारण्याकडून महापुरुषांचा ठरवून अपमान केला जातोय. अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केली. पुणे बंदच्या मोर्चाला उद्देशून अंधारे यांनी भाषण केलं.
फडणवीस यांच्या मनात या महापुरुषांबद्दल आकस नसता तर त्यांनी बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर तत्काळ प्रतिक्रिया दिली असती. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रावण असं संबोधल्यानंतर फडणवीस यांनी कशी तत्काळ माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. तशी प्रतिक्रिया राज्यपालांच्या वक्तव्यावर दिली नाही, अशी टीकाही सुषमा अंधारे यांनी केली.
भाजपचं शिवरायांवरचं प्रेम बेगडी आहे. त्यांना महापुरुषांपेक्षा खुर्ची महत्त्वाची वाटत असेल तर त्यांच्या खुर्च्या हिसकावल्या पाहिजेत.
यांच्या खुर्च्या हिसकावणे हा सर्वात मोठा आंदोलनाचा इशारा असेल. आपण हे आंदोलन एवढ्याच ताकतीने पुढे नेणार आहोत, आपण सगळे एक दिलाने एकत्र यावे, असे आवाहन सुषमा अंधारे यांनी केलं.
शिवरायांचं नाव घेऊन भाजपमधून आमदारकी, खासदारकी, इतर पदांच्या तुटपुंज्या पदांसाठी बाहेर निघत नाहीत. या गोचिडांपेक्षा गुन्हे अंगावर घेणाऱ्या वाघांचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे, असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलं.