मोदींनी आरोप केले तेव्हा विवेकवाद कुठे होता?; सुषमा अंधारे यांचा फडणवीस यांना थेट सवाल
नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून आता महायुतीतच वाद निर्माण झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून मलिक यांना महायुतीत घेण्यास कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे अजितदादा गटाची चांगलीच कोंडी झाली आहे. फडणवीस यांच्या पत्रावर अजितदादा गटाकडून अद्याप कोणतंही उत्तर आलेलं नाही. त्यामुळे त्यांच्याही भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पुणे | 7 डिसेंबर 2023 : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावरून महायुतीत ठिणगी पडली आहे. नवाब मलिक हे आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी बाकावर बसले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप केले, तीच व्यक्ती सत्ताधारी बाकावर बसल्याने फडणवीस यांची चांगलीच कोंडी झाली होती. त्यामुळे फडणवीस यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिक यांना महायुतीत घ्यायला विरोध दर्शविला आहे. सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजितदादा यांच्यावर आरोप केल्यानंतर तुमचा विवेकवाद कुठे होता? असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक व्हिडीओ शेअर करून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नवाब मलिक हे अजितदादा गटासोबत आल्यामुळे देवेंद्र फडणीस यांनी अजितदादांना पत्र लिहिलंय. मलिक यांना महायुतीत सामावून घेऊन नये असं फडणवीस यांनी अजितदादांना सांगितलं. गंमतीदार भाग आहे. ज्या पद्धताने फडणवीस ट्रोल झाले, त्यानंतर त्यांना ही उपरती आली आहे. पत्रामध्ये ते सत्तेपेक्षा देश मोठा म्हणत आहेत. फडणवीस यांना साधा प्रश्न आहे, सत्तेपेक्षा देश मोठा असं भाजपला वाटत असेल तर भाजपने ज्या ज्या लोकांवर आरोप केले त्यांना सत्तेत घेताना हा विवेकवाद कुठे गेला होता?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.
कोणत्या नेत्याला पत्र लिहिणार?
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही ज्या अजितदादांना पत्र लिहित आहात त्याच अजितदादांवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात येऊन 70 हजार कोटीच्या सिंचन आणि बँक घोटाळ्याचा आरोप केला होता. एवढा गंभीर आरोप झाल्यावरही 48 तासाच्या आत त्यांना सत्तेत घेणं तुमच्या नैतिकतेत बसलं होतं का? त्यावेळी सत्तेपेक्षा देश मोठा हे तत्त्वज्ञान का सूचलं नाही? अजितदादांना सत्तेत घेणं चुकीचं आहे हे सांगणारं पत्र तुम्ही भाजपच्या कोणत्या नेत्याला लिहिणार आहात? एवढाच प्रश्न आहे, असे सवालच अंधारे यांनी फडणवीस यांना केले आहेत.
हाच फरक आहे… देशभक्त फडणवीस
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहिल्यानंतर भाजपने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे. भाजपने ट्विट करत ठाकरे यांना डिवचलं आहे. सत्ता येते आणि जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा… हाच फरक आहे देशभक्त देवेंद्र फडणवीस आणि सत्तेसाठी नवाब मालिकांचा राजीनामा न घेणाऱ्या सत्तापिपासू उद्धव ठाकरे यांच्यामध्ये, अशी टीका भाजपने केली आहे.
नवाब मलिक भाऊ
याच मुद्द्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना नवाब मलिक यांची बाजू घेतली आहे. नवाब मलिक हे फक्त राष्ट्रवादी नाही तर महाराष्ट्राचे नेते आहेत. भाजपच्या विरोधात ते ताकदीने लढले आहेत. आमच्याकडून नवाब मलिकांचा सन्मान होईल. माझ्यासाठी नवाब मलिक आमच्या कुटुंबातील भाऊ आहेत. त्यांच्यावरील आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिलं असेल तर दुर्दैवी आहे. महाराष्ट्रच राजकारण खालच्या पातळीवर गेल आहे. नवाब मलिक जामिनावर आहेत. त्यांच्यावर कोणतेच आरोप सिद्ध झालेले नाहीत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.