…तर आम्ही ‘तो’ गुन्हा करणारच; गुन्हा दाखल झाल्यानंतर सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया
पंतप्रधानांची नक्कल केल्याने अंधारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अंधारे यांनी प्रतिक्रिया देताना 'देशात सत्य मांडणं गुन्हा असेल तर तो गुन्हा आम्ही करणारच' असं म्हटलं आहे.
मुंबई : ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची मिमिक्री केली होती. पंतप्रधानांची नक्कल केल्याने अंधारे यांच्याविरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देत पुन्हा एकदा शिंदे गटावर घणाघात केला आहे. ‘देशात सत्य मांडणं गुन्हा असेल तर तो गुन्हा आम्ही करणार’ असं अंधारे यांनी म्हटलं आहे. ‘ठाण्यातील महाप्रबोधन यात्रेतील गर्दी शिंदे गटाच्या डोळ्यात खुपली असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या अंधारे?
सुषमा अंधारे यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. देशात सत्य मांडणं गुन्हा असेल तर तो आम्ही करणारच असं अंधारे यांनी म्हटलं आहे. ठाण्यातील महाप्रबोधन यात्रेतील गर्दी शिंदे गटाच्या डोळ्यात खुपली असंही अंधारे यांनी म्हटलं आहे.
‘अजून नोटीस आलेली नाही’
पुढे बोतलताना सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे की, मला अजून नोटीस आलेली नाही, मात्र नोटीस आली तर पोलीस स्टेशला हजर राहण्यास काहीच हरकत नाही. कारण मी वारंवार सांगते कायदा माझ्या बापाने लिहिला आहे. त्यामुळे माझ्या बापाने लिहिलेल्या कायद्याचा मी आदर नाही करायचा तर कोणी करायचा? मी कायद्याचा आदर करणार आहे. आणि त्या नोटीशीला जे काय असेल ते कायदेशीर उत्तर पण देणार असल्याचं अंधारे यांनी म्हटलं आहे. दरम्यान दुसरीकडे आज देखील ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर निर्णयाची शक्यता कमी आहे.