बशीर बद्र यांच्या शायरीतून सुषमा स्वराजांचा ममतांवर निशाणा
नवी दिल्ली : ‘फनी’ वादळाच्या फोनवरुन पश्चिम बंगाल सरकार आणि केंद्र सरकारमध्ये सुरु झालेल्या वादावर आता ‘ट्वीट वॉर’ सुरु झाली आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. सुषमा स्वराज यांनी मंगळवारी दोन वेगवेगळे ट्वीट करत प्रियांका गांधी यांना मनमोहन सिंह सरकारच्या […]
नवी दिल्ली : ‘फनी’ वादळाच्या फोनवरुन पश्चिम बंगाल सरकार आणि केंद्र सरकारमध्ये सुरु झालेल्या वादावर आता ‘ट्वीट वॉर’ सुरु झाली आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला.
सुषमा स्वराज यांनी मंगळवारी दोन वेगवेगळे ट्वीट करत प्रियांका गांधी यांना मनमोहन सिंह सरकारच्या काळाची आठवण करुन दिली. तर दुसरीकडे त्यांनी ममता बॅनर्जी यांना शायरीच्या माध्यमातून इशारा वजा सल्ला दिला.
प्रियांकाजी अहंकारी कोण आहे?
सुषमा स्वराज यांनी प्रियांका गांधींवर निशाणा साधत ट्वीट केलं की, “प्रियांका जी, तुम्ही अहंकाराची भाषा करता. मी तुम्हाला आठवण करुन देऊ इच्छिते की, अहंकाराची सीमा तर त्या दिवशीच पार झाली होती जेव्हा राहुल गांधींनी आपल्याच पंतप्रधान म्हणजेच डॉ. मनमोहन सिंग यांचा अपमान करत राष्ट्रपतींकडून प्रसिद्ध करण्यात आलेला अध्यादेश फाडून फेकला. कोण कुणाला ऐकवत आहे?”
प्रियंका जी – आज आपने अहंकार की बात की. मैं आपको याद दिला दूँ की अहंकार की पराकाष्ठा तो उस दिन हुई थी जिस दिन राहुल जी ने अपने ही प्रधान मंत्री डाक्टर मनमोहन सिंह जी का अपमान करते हुए राष्ट्रपति द्वारा जारी अध्यादेश को फाड़ कर फेंका था. कौन किसको सुना रहा है ?
— Chowkidar Sushma Swaraj (@SushmaSwaraj) May 7, 2019
बशीर बद्र यांच्या शायरीतून ममता यांना सल्ला
‘फनी’ चक्रीवादळावरुन सुरु झालेल्या वादावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांवर अनेक घणाघाती टीका केल्या. त्यावर सुषमा स्वराज यांनी ममता बॅनर्जींवर पलटवार करत ट्वीट केलं, “ममता जी, आज तुम्ही सर्व सीमा ओलांडल्या आहेत. तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्री आहात आणि मोदी जी हे देशाचे पंतप्रधान आहेत. उद्या तुम्हाला त्यांच्याशीच जुळवून घ्यायचं आहे. म्हणून तुम्हाला बशीर बद्र यांच्या एका शायरीची आठवण करवून देते : दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाएं तो शर्मिंदा न हों.”
ममता जी – आज आपने सारी हदें पार कर दीं. आप प्रदेश की मुख्यमंत्री हैं और मोदी जी देश के प्रधान मंत्री हैं. कल आपको उन्हीं से बात करनी है. इसलिए बशीर बद्र का एक शेर याद दिला रही हूँ : दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों.
— Chowkidar Sushma Swaraj (@SushmaSwaraj) May 7, 2019
मोदी अहंकारी आहेत : प्रियांका गांधी
प्रियांका गांधी यांनी मंगळवारी हरियाणाच्या अंबाला येथील सभेत मोदींवर टीका केली. “मोदी हे दुर्योधनासारखे अहंकारी आहेत”, असा घणाघात प्रियांका गांधी यांनी मोदींवर केला होता. मोदींनी राजीव गांधी यांना भ्रष्टाचारी म्हटलं होतं, त्यावर पलटवार करत प्रियांका गांधींनी हे वक्तव्य केलं होतं. “देश तुमच्या अहंकाराला कधी क्षमा नाही करणार, असाच अहंकार दुर्योधनमध्येही होता. जेव्हा श्रीकृष्ण हे दुर्योधनाला समजवायला गेले होते, तेव्हा त्या अहंकारी दुर्योधनाने श्रीकृष्णालाही बंधक बनवण्याचा प्रयत्न केला होता. दिनकर जींच्या काही ओळी आहेत : जब नाश मनुज पर छाता हैं, पहले विवेक मर जाता हैं”, असं वक्तव्य प्रियांका गांधी यांनी केलं होतं.
‘फनी’बाबत पंतप्रधानांनी मला फोनही केला नाही : ममता बॅनर्जी
ममता बॅनर्जी यांनी एका सभेत म्हटलं की, मला पंतप्रधान मोदींना लोकशाहीतूनच थप्पड लगावण्याची इच्छा आहे. “मी इतका खोटारडा पंतप्रधान आतापर्यंत पाहिलेला नाही. जेव्हा निवडणुका येतात तेव्हा रामाच्या नावाचा जाप करण्यास सुरुवात करतात. पाच वर्षांपूर्वी त्यांनी अच्छे दिन येणार असं सांगितलं होतं. मात्र, त्यानंतर नोटाबंदी केली. ते संविधानही बदलतील”, असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी मोदींवर निशाणा साधला. “भाजपच्या घोषणांवर माझा विश्वास नाही. माझ्यासाठी पैसा महत्त्वाचा नाही. पण, जेव्हा नरेंद्र मोदी बंगालमध्ये येऊन म्हणतात की टीएमसीमध्ये दरोडेखोर आहेत. तेव्हा मला त्यांच्या कानशीलात लावण्याची इच्छा होते”, असा घणाघात ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांवर केला.
नेमकं प्रकरण काय?
पश्चिम बंगालमध्ये ‘फनी’ चक्रीवादळाने हाहा:कार माजवला. याच वादळावरुन पश्चिम बंगाल सरकार आणि केंद्र सरकारमधील वादाला सुरुवात झाली. ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांवर आरोप लावला की, इतक्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीनंतरही मोदींनी त्यांना एक फोन करुन परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्नही नाही केला. यानंतर पंतप्रधान कार्यालयाने या आरोपाला फेटाळून लावलं. मोदींनी त्यांच्या बंगालच्या सभेत या प्रकरणाचा उल्लेख केला. तसेच त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर पलटवार करत आम्ही ममता दीदींसोबत बैठक करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, मुख्यमंत्री कार्यालयाने तो नाकारला, असं पंतप्रधानांनी सांगितलं. यानंतर ममता बॅनर्जी यांनी पुन्हा मोदींवर निशाणा साधत म्हटलं, हे लोक डोक्यापासून ते पायापर्यंत गुन्हेगारीत बुडालेले आहेत, मी यांच्यासोबत एकाच मंचावर नाही राहू शकत.