एका ट्वीटवर मदत करणाऱ्या सुषमा स्वराज निवडणूक लढणार नाहीत
नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री सुषमा यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये त्यांनी ही घोषणा केली. अंतिम निर्णय पक्ष घेतो, पण निवडणूक लढायची नाही हा स्वतःचा निर्णय आहे, असं सुषमा स्वराज म्हणाल्या. सुषमा स्वराज यांच्या या निर्णयाचं त्यांचे पती स्वराज कौशल यांनीही स्वागत केलं आहे. प्रकृती अस्वास्थ्य हे […]
नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री सुषमा यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये त्यांनी ही घोषणा केली. अंतिम निर्णय पक्ष घेतो, पण निवडणूक लढायची नाही हा स्वतःचा निर्णय आहे, असं सुषमा स्वराज म्हणाल्या. सुषमा स्वराज यांच्या या निर्णयाचं त्यांचे पती स्वराज कौशल यांनीही स्वागत केलं आहे. प्रकृती अस्वास्थ्य हे स्वराज यांच्या निर्णयामागचं कारण असल्याचं बोललं जात आहे.
सुषमा स्वराज यांच्या निर्णयानंतर स्वराज कौशल यांनी ट्वीट केलं. मॅडम, निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याबद्दल धन्यवाद. मला एक वेळ आठवते, जेव्हा मिल्खा सिंहनेही पळणं बंद केलं होतं, असं ट्वीट स्वराज कौशल यांनी केलं.
सुषमा स्वराज मध्य प्रदेशातील विदिशामधून खासदार आहेत. मध्य प्रदेशात सध्या विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापलेलं असतानाच निवडणूक न लढण्याचा निर्णय सुषमा स्वराज यांनी जाहीर केला. सुषमा स्वराज सध्या भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या तीनही सरकारमध्ये सुषमा स्वराज मंत्री होत्या. शिवाय त्यांनी दिल्लीचं मुख्यमंत्रीपदही भूषवलं आहे.
सुषमा स्वराज यांच्या नावाची चर्चा 2014 च्या अगोदर पंतप्रधानपदासाठीही होती. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरल्यानंतर सुषमा स्वराज यांच्या नावाच्या चर्चेवर पूर्ण विराम मिळाला.
सुषमा स्वराज या 1977 ते 1982 या काळात हरियाणा विधानसभेत आमदार होत्या. वयाच्या 25 व्या वर्षी त्यांनी अंबाला कँटोनमेंट या मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यानंतर त्या पुन्हा एकदा 1987 ते 1990 या काळात विधानसभेवर निवडून गेल्या.
1977 साली जुलैमध्ये देवी लाल यांच्या सरकारमध्ये सुषमा स्वराज यांनी कॅबिनेटमंत्री म्हणून शपथ घेतली. 1979 मध्ये त्यांच्यावर हरियाणाच्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती, जेव्हा त्यांचं वय केवळ 27 वर्षे होतं. हरियाणामध्ये त्यांनी शिक्षण मंत्री म्हणूनही काम पाहिलं होतं.
केंद्रात आल्यानंतर सुषमा स्वराज या त्यांच्या झटपट कामासाठी ओळखल्या जाऊ लागल्या. परराष्ट्रमंत्री झाल्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या सभेतील भाषण असो, किंवा पासपोर्ट बनवण्याच्या प्रक्रियेत सुरळीतता आणणं असो. सुषमा स्वराज यांनी आतापर्यंत अनेकांना फक्त एका ट्वीटवर मदत केली आहे.