‘स्वाभिमान’ची ‘स्वाभिमानी’ला साथ? राजू शेट्टी नारायण राणेंच्या भेटीला
माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांनी नुकतंच स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांची मुबंईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
मुंबई : माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांनी नुकतंच स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांची मुबंईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे बोललं जात आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच राजू शेट्टी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर काल रविवारी (28 जुलै) राजू शेट्टी यांनी नारायण राणेंच्या जुहू येथील राहत्या घरी भेट घेतली. या भेटीत जवळपास अर्धा तास या दोघांमध्ये विविध राजकीय विषयांसह विधानसभा निवडणुकांबाबत चर्चा झाली.
यावेळी या दोघांमध्ये ईव्हीएम संदर्भात चर्चा झाली. तसेच येत्या विधानसभा निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात याबाबतही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे नारायण राणे यांना आघाडीसोबत आणण्याचा राजू शेट्टी यांचा प्रयत्न असल्याचेही या भेटीवरुन बोललं जात आहे.
दरम्यान काही दिवसांंपूर्वी राजू शेट्टी आणि राज ठाकरे यांची दोनदा भेट झाली होती. त्यांच्या या भेटीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी आणि भाजप-शिवसेना यांच्या युतीला पर्याय म्हणून मनसे-स्वाभिमानी यांची आघाडी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांची भूमिका काय असणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
संबंधित बातम्या :