पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उडी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी वाढणार?
माजी खासदार राजू शेट्टी उमेदवाराच्या प्रचारासाठी पंढरपुरात तळ ठोकून गावोगावी जावून प्रचार सभा ही घेणार आहेत.
पंढरपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचं 28 नोव्हेंबर रोजी निधन झालं. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. राष्ट्रवादीने भारत भालकेंचे सुपुत्र भगिरथ भालके (Bhagirath Bhalke) यांना उमेदवारी दिली आहे. त्याविरोधात भाजपने समाधान आवताडे (Samadhan Autade) यांना रिंगणात उतरवलं आहे. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेदेखील या निवडणुकीत उडी घेतली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवारी अर्ज दाखल होणं महाविकास आघाडीसाठी धक्का मानला जात आहे. (Swabhimani Shetkari Sanghatana contest Pandharpur by polls may increase problems for NCP)
स्वाभिमानीकडून सचिन शिंदे-पाटील यांना उमेदवारी
पंढरपूर मंगळवेढा पोट निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालकेंच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं. स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष सचिन शिंदे-पाटील यांच्या उमेदवारी अर्जासोबत आज स्वाभिमानी पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याद्वारे महाविकास आघाडीच्या विरोधात रणशिंग फुंकलं असल्याचं बोललं जात आहे. माजी खासदार राजू शेट्टी स्वाभिमानीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पंढरपुरात तळ ठोकून राहणार आहेत. ते गावोगावी जाऊन प्रचार सभाही घेणार आहेत, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
भाजप- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमनेसामने
राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर होणारी पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. सांगली आणि जळगाव महानगरापालिकेत ओढावलेल्या नामुष्कीनंतर भाजपने आता पंढरपुरात संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावायची ठरवली आहे. त्यासाठी भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीने भारत भालकेंचे सुपुत्र भगिरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही उमेदवारांचे अर्ज आज दाखल करण्यात आले. यानिमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हानही दिले आहे.
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक
17 एप्रिलला मतदान, 2 मे रोजी गुलाल!
अर्ज भरण्यास सुरुवात – 23 मार्च 2021 >> अर्ज भरण्याची अंतिम तारीख – 30 मार्च 2021 >> अर्जांची छाननी – 31 मार्च 2021 >> अर्ज मागे घेण्याची तारीख – 3 एप्रिल 2021 >> मतदान – 17 एप्रिल 2021 >> निवडणूक निकाल – 2 मे 2021
संबंधित बातम्या:
Pandharpur Assembly By-Election : राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार जाहीर
पवारांकडून आधी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी संधी, आता वडिलांच्या जागी तिकीट, कोण आहेत भगीरथ भालके?
(Swabhimani Shetkari Sanghatana contest Pandharpur by polls may increase problems for NCP)