संजय राऊतांचे पोस्टर्स जाळले, मराठा समाज आक्रमक, स्वराज्य संघटनेची भूमिका काय?

| Updated on: Dec 19, 2022 | 10:57 AM

संजय राऊत यांच्याविरोधात स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी काल ट्विटरवरून तीव्र संताप व्यक्त केला.

संजय राऊतांचे पोस्टर्स जाळले, मराठा समाज आक्रमक, स्वराज्य संघटनेची भूमिका काय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात मराठा समाज अधिकच आक्रमक झाला आहे. आज शिवसेना (Shivsena) भवनाबाहेर स्वराज्य संघटनेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केलं. संजय राऊत यांनी काल महाविकास आघाडीचा महामोर्चा असल्याचा दावा करत एक व्हिडिओ अधिकृत ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला. मात्र हा व्हिडिओ मराठा क्रांती मोर्चाचा (Maratha kranti morcha) असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राऊतांनी खोटेपणा करत मराठा मोर्चाचा व्हिडिओ वापरल्याचा आरोप करत मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत.

मुंबई आज संजय राऊत यांचे पोस्टर्स जाळण्यात आले. राऊतांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. स्वराज्य संघटनेचे नेते अंकुश कदम यांनी राऊतांविरोधात घणाघाती टीका केली. मराठा क्रांती मोर्चाच्या मूक मोर्चाला हिणवणाऱ्या राऊत यांनी आमच्या मोर्चाचा व्हिडिओ का वापरला? याचा जाब विचारला जावा, अशी मागणी त्यांनी केली.

छत्रपती संभाजीराजेंचं ट्विट

संजय राऊत यांच्याविरोधात स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी काल ट्विटरवरून तीव्र संताप व्यक्त केला. ज्या मोर्चाला तुम्ही मुका मोर्चा म्हणून हिणवलं, तोच मराठा क्रांती मोर्चा आज स्वतःच्या राजकारणासाठी वापरत आहात… या मोर्चाची चेष्टा करणारेही तुम्हीच होता. आज नसलेली ताकद दाखवताना जरा तरी तमा बाळगा.. असा इशारा संभाजीराजेंनी दिला आहे.

गिरे तो भी टांग उपर….

शिंदे गटाचे नेते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनीदेखील संजय राऊतांवर ट्विटरद्वारे टिप्पणी केली आहे. महाराष्ट्रातील जनतेला तुम्ही दुधखुळी समजता काय? तुमच्याकडे काही उरलं नाही, हे मान्य करा. गिरे तो भी टांग उप्पर… त्यांना काय म्हणतात माहिती आहे नं… अशा शब्दात म्हस्के यांनी राऊतांची कानउघडणी केली आहे.