मुंबई: शिवसेना पाठिमागून वार करत नाही. समोरून शिवसेना निर्णय घेते. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना शिवसेनेचीच फूस असल्याच्या आरोपात तथ्य नाही, असं सांगतानाच आज शरद पवार (sharad pawar) आणि उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) भेटतील. शिंदे यांच्या बंडावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होईल. आम्ही संघर्ष करू. शिवसेना हा संघर्ष करणारा पक्ष आहे. फार फार काय होईल? सत्ता जाईल. सत्ता परत येऊ शकते. पण पक्षाची प्रतिष्ठा सर्वात मोठी असते, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे. संजय राऊत यांनी मीडियासशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. आमदार गुवाहाटीला गेले आहेत. त्यांनी तिथलं जंगल पाहावं. आमदारांनी फिरलं पाहिजे. देश पाहिला पाहिजे. देश समजून घेतला पाहिजे. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असंही राऊत म्हणाले.
काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत आम्ही सरकारमध्ये आहोत. आज सकाळीच माझं एकनाथ शिंदेंसोबत बोलणं झालं. आमच्यात तासभर बोलणं झालं. आमचं फोनवर बोलणं झाल्याची कल्पना मी उद्धव ठाकरे यांना दिली आहे. पक्षाकडूनही त्यांच्याशी संवाद सुरू आहे. शिंदे हे शिवसैनिक आहेत. त्यांनी शिवसेनेचंच काम केलं आहे. पण कुणाला आनंदाचं भरतं आलं असेल तर तसं होणार नाही. सर्व आमदारांना शिवसेनेसोबत राहायचं आहे. काही समज गैरसमज असतात. ते दूर होतील, असं राऊत म्हणाले.
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे सरकार कोसळेल असं भाजपला वाटत असेल. पण शिवसेनेत राखेतून गरूड झेप घेण्याची ताकद आहे. शिंदेंसोबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. पक्ष सोडणं शिंदेंना सोपं नाही. आम्हालाही शिंदेंना सोडणं सोपं नाही. एकतास मी त्यांच्याशी बोललो. परत त्यांच्याशी चर्चा होईल. सर्व शिवसेनेत परत येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यपालांना कोरोना झाला आहे. थोडं काम स्लो चाललं आहे. सर्वात आधी राज्यपाल ठिक झाले पाहिजे, त्यांना बरं वाटू द्या. तुम्ही उगाच उतावीळ होऊ नका. आम्हाला खात्री आणि विश्वास आहे. शिंदे आणि सर्व लोक स्वगृही परत येतील. कितीही असू द्या. हा आमच्या घरातील विषय आहे. हे सर्व लोकं आमच्या सोबत येतील. आमचा व्यवस्थित संवाद सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं.
ठाणे महापालिका, केडीएमसी पालिका शिंदे यांच्या मताप्रमाणेच लढल्या जातात. त्यामुळे त्यांच्या मनासारखं होत नाही हे चुकीचं आहे. शिंदे माझे जीवाभावाचे मित्रं आहेत. त्यांचा पक्षात सर्वांशी चांगला संवाद आहे. आम्ही चांगल्या पद्धतीने बोलत आहोत. त्यांच्या काही मागण्या नाही. त्यांनी कोणत्याही अटीशर्ती ठेवल्या नाहीत. ते शिवसेनेतच राहतील. असं त्यांच्याशी बोलण्यातून जाणवतं, असंरही त्यांनी सांगितलं.