1 लाख वेळा माफी मागेन; …. तर राजीनामाही देईन, तानाजी सावंतांचं ‘त्या’ वक्तव्यावरून रोखठोक उत्तर!
मराठा आरक्षणावरून टीका करणाऱ्या नेत्यांवर तानाजी सावंत यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या चांगलंच गाजतंय. त्यावर त्यांनी अगदी सविस्तर उत्तर दिलं असून माफीही मागितली आहे.
अश्विनी सातव, पुणेः ज्या मराठा (Maratha) समाजाच्या जीवावर मी कॉलर ताठ करून हिंडतो, त्याची एक वेळा नाही तर एक लाख वेळा माफी मागायची माझी तयारी आहे. मात्र माझं वक्तव्य पूर्णपणे ऐकून घ्यावं. त्याचा विपर्यास करू नये, असं स्पष्टीकरण आरोग्य मंत्री आणि मराठा समाजाचे नेते तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी दिलंय. उस्मानाबाद येथील त्यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून मराठा समाज चांगलाच आक्रमक झालाय. भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनाही यावर प्रतिक्रिया द्यावी लागली. त्यानंतर आता स्वतः तानाजी पाटील यांनी पुण्यातील टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी बोलताना सविस्तरपणे आपलं म्हणणं मांडलं.
तानाजी सावंत म्हणाले, ‘ 2020 च्या वेळी मराठा आरक्षण रद्द झालं. देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण मिळवून दिलं. त्याचा काही तरुणांना फायदाही झाला. पण आरक्षण रद्द झाल्यापासून ते कालचं सरकार येईपर्यंत कोणत्याही मराठा नेत्यानं यासंदर्भात भाष्य केलं नाही….
पण शिंदे-फडणवीस सरकार आलं, तशा विकृती जागृत झाल्या. मग हे आरक्षण यातून मिळालं पाहिजे, ते आरक्षण त्यातून मिळालं पाहिजे, अशा मागण्या सुरु झाल्याचं तानाजी सावंत म्हणाले.
तानाजी सावंतांचं स्पष्टीकरण पहा…
मी मराठा समाजाचा आहे. तळागाळातील शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझ्या समाजाला आरक्षण मिळावं ही माझी पहिली मागणी आहे. मराठा आरक्षण टिकाऊ मिळालं पाहिजे. याचं काढून त्याला द्या… ही समाजात भांडणं लावायची वृत्ती आहे, त्यावर मी बोट ठेवलं होतं. हे कोण करतं… त्यांच्याविषयी मी बोलत होतो…
लाख वेळा माफी मागेन…
तानाजी सावंत पुढे म्हणाले, ‘ राहिला विषय माफी मागायचा… ज्या समाजाच्या जीवावर मी ताठ कॉलर करून हिंडतो. त्यांच्या हृदयाला खटकलं असेल तर मी एकदा नाही तर एक लाख वेळा माफी मागेन.
माफी मागणे वगैरेसाठी मला लाज वाटत नाही. पण मी म्हटलं आरक्षणाला जे डॅमेज झालंय, ते दुरूस्त करण्यासाठी शिंदे सरकारला वेळ द्या. माझ्या समाजाला आक्रमक होण्याचा, माझ्यावर प्रेम करण्याचा अधिकार आहे. मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा, जो जो मराठा कार्यकर्ता आहे. त्या अगदी पाळण्यातल्या बाळापासून 90 वर्षांच्या आजोबापर्यंत सर्वांची मी माफी मागतो..
… तर राजीनामाही देईन
2024 पर्यंत आरक्षण नाही मिळालं तर हा तानाजी सावंत आपल्या पदाचा राजीनामा देऊन मराठा समाजाबरोबर मोर्चात तुमच्याबरोबर शामिल होईल, असं आश्वासनही तानाजी सावंत यांनी दिलंय.