‘कोकणावर राजकारणासाठी जेवढं प्रेम केलं जाते, तेवढंच प्रेम अशा संकटाच्या काळातही केलं जावं’, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

| Updated on: May 20, 2021 | 9:07 PM

कोकणाने नेहमीच शिवसेनेला भरभरुन दिलं आहे. पण आता देण्याची वेळ आली तेव्हा हात आखडता घेतला जात असल्याची टीका फडणवीसांनी केलीय.

कोकणावर राजकारणासाठी जेवढं प्रेम केलं जाते, तेवढंच प्रेम अशा संकटाच्या काळातही केलं जावं, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
Follow us on

सिंधुदुर्ग : तौत्के चक्रीवादळानं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर होते. या दोन दिवसांत फडणवीसांनी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या नुकसानाची पाहणी केली आणि नुकसानग्रस्त कोकणवासियांशी संवाद साधला. त्यावेळी माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला हाणलाय. कोकणाने नेहमीच शिवसेनेला भरभरुन दिलं आहे. पण आता देण्याची वेळ आली तेव्हा हात आखडता घेतला जात असल्याची टीका फडणवीसांनी केलीय. (Opposition Leader Devendra Fadnavis criticizes CM Uddhav Thackeray)

आपण सगळ्यांनी नेहमीच पाहिलं आहे की, कोकणाने शिवसेनेला भरपूर दिलं आहे. पण आता निसर्ग चक्रीवादळ असो की तौत्के असो, जेव्हा देण्याची वेळ आहे तेव्हा हात आखडता घेतला जातोय. मग कधी केंद्राकडे बोट दाखवायचं, कधी अजून तिसरीकडे बोट दाखवायचं. मला असं वाटतं की एकीकडे 500 ते 600 कोटी रुपये एकएका मतदारसंघात घेऊन चालले आहेत. मात्र, चक्रीवादळाने नुकसान झालेल्या जिल्ह्यांना 150 ते 200 कोटी रुपये देण्यासाठीही बहाणे सांगितले जातात, हे काही योग्य नाही. आमची अपेक्षा आहे की सरकारने योग्यप्रकारे मदत केली पाहिजे.

आंबा उत्पादकांना मदतीची मागणी

तौत्के चक्रीवादळामुळे आंबा उत्पादकांचं मोठं नुकसान झालंय. अनेक झाजं उन्मळून पडल्यानं भविष्यातील काळासाठीही हे मोठं नुकसान आहे. त्याचबरोबर मासेमारी करणाऱ्यांच्या जुन्या बोटींचे परवाना नुतनीकरण, डिझेल परतावा अशा अनेक मागण्या आहे. त्या सर्व शासनाकडे मांडण्यात येईल, असं आश्वासनही यावेळी फडणवीसांनी दिलंय.

आत्मविश्वासी नव्हे हे तर आत्मघातकी सरकार

महाविकास आघाडी सरकार आत्मविश्वासी नव्हे हे तर आत्मघातकी सरकार आहे. मागील निसर्ग वादळावेळी जाहीर केलेली मदत अजून मिळालीच नाही, आता तरी मदत मिळावी, असं फडणवीस म्हणाले. कोकणात सलग दुसऱ्या वर्षी मोठं नुकसान झालं आहे. सलग दुसऱ्या वर्षी हा दौरा आहे. कोकणाचं मोठं नुकसान झालंय, मात्र गेल्यावर्षीची काहीच मदत अजून मिळालेली नाही. निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी जाहीर झालेली मदत अद्याप मिळालेली नाही. काहीही झालं की केंद्राकडे बोट दाखवायचं हे नेहमीचं झालंय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर नितेश राणेंची टीका

तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा म्हणजे केवळ दिखाऊपणा आहे. लिपस्टिक लावल्यावर सगळं कसं छान सुंदर आहे हे दाखवलं जातं आणि तोंड धुतल्यावर सगळं निघून जाते, तसा हा प्रकार असल्याची टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दौरा हा कोकणातील वस्तुस्थिती सरकारपुढे मांडण्यासाठी होता. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याने काहीही साध्य होणार नाही, असे नितेश राणे यांनी म्हटले.

संबंधित बातम्या :

देवेंद्र फडणवीसांनी दौरे करण्यासाठी ई-पास काढलाय का? RTI मध्ये विचारणा, निलेश राणेंचं उद्धव ठाकरेंकडे बोट

PHOTO : ‘तौत्के’च्या तडाख्यानंतर देवेंद्र फडणवीस कोकणात, नुकसानाचा आढावा घेत तातडीच्या मदतीची मागणी

Opposition Leader Devendra Fadnavis criticizes CM Uddhav Thackeray